जळगाव -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मनपा प्रशासनाकडून अतिक्रमण करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. कारवाई दरम्यान जप्त केलेल्या हातगाड्या गेल्या दीड महिन्यापासून मनपा प्रांगणात पडून आहेत. जप्त केलेल्या हातगाड्या दंडात्मक कारवाई करून सोडण्याच्या सूचना मंगळवारी महापौर भारती सोनवणे यांनी प्रशासनाला केल्या.
दंडात्मक कारवाई करून हॉकर्सच्या हातगाड्या सोडा; महापौरांनी केल्या प्रशासनाला सूचना - हॉकर्स
अतिक्रमण विभागाच्या पथकाने एका शेतकऱ्याचे शेतमालाचे ट्रॅक्टर पकडले होते. कृषी विभागाचा परवाना असताना कारवाई केल्याने संतप्त शेतकऱ्याने टरबूज मनपाच्या प्रांगणात ओतले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापौर भारती सोनवणे यांनी आपल्या दालनात बैठक बोलावली होती
अतिक्रमण विभागाच्या पथकाने एका शेतकऱ्याचे शेतमालाचे ट्रॅक्टर पकडले होते. कृषी विभागाचा परवाना असताना कारवाई केल्याने संतप्त शेतकऱ्याने टरबूज मनपाच्या प्रांगणात ओतले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापौर भारती सोनवणे यांनी आपल्या दालनात बैठक बोलावली होती. यावेळी महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले की, मी स्वतः एका शेतकऱ्याची मुलगी असून शेतकरी घेत असलेल्या कष्टाची मला जाण आहे. शेतकरी थेट ग्राहकांना माल विक्री करीत असेल तर त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. शेतकरी कुठेही भाजीपाला, फळे विक्री करीत असेल आणि त्याठिकाणी सोशल डिस्टसिंगचे पालन होत नसल्यास त्यांना अगोदर सूचना द्यावी आणि तरीही ऐकत नसेल तर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशा सूचना महापौरांनी दिल्या.
दंडात्मक कारवाई करून हातगाड्या परत द्या-
गेल्या दीड महिन्यात अतिक्रमण विभागाने कारवाई करून मोठ्याप्रमाणात हातगाड्या जप्त केल्या आहे. अनेक हॉकर्स दररोज भाड्याने हातगाड्या घेऊन येतात. हातगाड्या जप्त असल्याने त्यांचा रोजगार हिरावला गेला असून त्यांना हातगाडीचे भाडे द्यावे लागत असल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. लॉकडाऊनमध्ये देखील जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी मनपाने जागा निश्चित करून दिल्या आहे. त्याठिकाणी हातगाड्या लावण्यासाठी हॉकर्सला त्यांच्या गाड्या दंडात्मक कारवाई करून परत द्याव्या, अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या. दरम्यान, अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय मनपा आयुक्त व प्रशासन घेणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.