जळगाव- जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे आद्य संतपीठ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे चांगदेव-मुक्ताबाई माघ वारी यात्रोत्सवाला हर्षोल्हासात प्रारंभ झाला आहे. माघ कृष्ण विजया एकादशी व महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या यात्रोत्सवात तीनशेहून अधिक दिंड्यांसह लाखो भाविक दाखल झाले आहेत. आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषात मुक्ताईनगरी दुमदुमली आहे.
यात्रोत्सवात आलेल्या हजारो भाविकांनी एकादशीच्या मुहूर्तावर तापी-पूर्णा संगमावर पवित्र स्नान केले. शनिवारी पहाटे ४ वाजता आदिशक्ती मुक्ताईच्या मूर्तीस संस्थानाचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते महाअभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सकाळी ५ वाजता खासदार रक्षा खडसे, मानाचे वारकरी मधुकर नारखेडे यांनी मुक्ताईला सपत्नीक अभिषेक घालून आरती केली.