जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवार बदलल्याने राजकीय गणितं बदलली आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादीचे उमेदवार माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासाठी सोपी वाटणारी लढत आता चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीमुळे तुल्यबळ होण्याचे संकेत आहेत.
भाजप-राष्ट्रवादीत तुल्यबळ लढतीचे संकेत जळगावचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचा पत्ता कापून भाजपने विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र, वाघ यांना उमेदवारी दिल्याने खासदार पाटील तसेच अमळनेरचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणातदेखील जळगावची जागा धोक्यात असल्याचा अहवाल आल्याने भाजपने सावध पवित्रा घेत ऐनवेळी स्मिता वाघ यांच्याऐवजी उन्मेष पाटील यांना पुढे केले.
पक्षाने ऐनवेळी आपली उमेदवारी कापून ४ वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देणं, हा 'राजकीय कोल्ड ब्लडेड मर्डर' असल्याची तीव्र प्रतिक्रिया स्मिता वाघ आणि त्यांचे पती तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिली. ते प्रचाराच्या प्रक्रियेपासून दूर झाल्याचे दिसत आहे. वाघ यांच्या समर्थकांमध्येही नाराजी असल्याने उन्मेष पाटलांना प्रतिस्पर्धी गुलाबराव देवकारांसोबतच स्वकियांचे मोठं आव्हान आहे.
उमेदवार बदलानंतर भाजपमधील अंतर्गत कलह काहीअंशी कमी झाला असला तरी मित्रपक्ष असलेली शिवसेना अजूनही पूर्णपणे भाजपच्या पाठीशी नसल्याचे चित्र आहे. पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची नाराजी दूर करण्यात भाजपला अजूनही यश आलेले नाही. दुसरीकडे, प्रतिस्पर्धी उमेदवार गुलाबराव देवकर यांना आमदार आणि मंत्रीपदाच्या काळात चांगली कामे केली असल्याने जनता आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास आहे. या दोन्ही बाबी उन्मेष पाटलांच्या वाटेत अडसर ठरू शकतात, असेही बोललं जात आहे.
उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपमधील वाघ विरोधक अंग झटकून कामाला लागले आहेत. जळगाव महापालिकेतील सर्व नगरसेवकही आता प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या देवकरांना कडवे आव्हान उभे राहिल्याचं दिसून येत आहे. एकंदरीतच, जळगाव लोकसभेत प्रथमदर्शनी एकतर्फी वाटणारी लढत आता चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.