जळगाव - मागच्या आठवड्यात जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या उमेदवारीवरून चर्चेत आला. उमेदवारीचा तिढा सुटल्यानंतर आता हा मतदारसंघ सेनेच्या पदाधिकाऱ्याने भाजपविरोधात केलेली उघड बंडखोरी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची राजकीय वाटचाल, अशा दोन विषयांवरून राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या मतदारसंघात भाजपने यावेळी खडसेंचे तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना रिंगणात उतरवले आहे. गेल्यावेळी एकनाथ खडसेंना चांगली टक्कर देणारे चंद्रकांत पाटलांचे त्यांना कडवे आव्हान आहे. या मतदारसंघाच्या निकालानंतर खडसेंच्या राजकीय कारकिर्दीचा खऱ्या अर्थाने फैसला होणार आहे. त्यामुळे मुक्ताईनगरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी, ५ जणांवर कारवाई
सन १९९० पासून सलग 6 वेळा या मतदारसंघात खडसे निवडून आले आहेत. त्यामुळेच त्यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला मानला जातो. गेली ३० वर्षे या मतदारसंघातून सलग निवडून येत असलेले खडसे यांना यावेळी पक्षाने तिकीट नाकारले. विरोधी बाकावर असताना सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्यात ३० वर्षे गेल्यानंतर जेव्हा सत्तेची फळे चाखण्याची वेळ आली, तेव्हा मात्र खडसेंच्या नशिबी 'वनवास' आला. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा खडसे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र, महसूल मंत्रिपदावर त्यांची बोळवण झाली.
वर्षभराच्या आतच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. नंतर 'क्लीन चिट' मिळाली. मात्र, पुन्हा मंत्रिपदापासून ते वंचितच राहिले. ही खदखद मनात ठेवून खडसेंनी अनेकदा जाहीरपणे आपल्याच सरकारला खडेबोल सुनावले. त्याचाच परिपाक म्हणजे यंदाच्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कापण्यात आला. त्यांच्याऐवजी पक्षाने कन्या रोहिणी खडसेंना तिकीट दिले आहे. भविष्यात खडसे डोईजड होऊ नये म्हणून भाजपने खडसेंचा पत्ता कापल्याचे जाणवत आहे. दुसरीकडे अंतर्गत स्पर्धेतून त्यांचे पंख छाटण्यात आल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.
हेही वाचा -शिवसेनेत इनकमिंग सुरूच, राष्ट्रवादीच्या राज्य उपाध्यक्षांसह माजी नगरसेवकांचा सेनेत प्रवेश
खडसेंचे राजकारण संपुष्टात येणार?