जळगाव - कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका हॉटेल उद्योगाला बसला आहे. मोठी हॉटेल्स आणि उपहारगृहात केवळ खाद्यपदार्थ पार्सल नेण्याची परवानगी असल्याने जेमतेम १० टक्के व्यवसाय होत आहे. त्यामुळे दररोजचा खर्चही निघत नसल्याने अनेक छोटे-मोठे हॉटेल्स तसेच उपहारगृहे बंद पडत आहेत. जळगाव शहरातील हॉटेल्स आणि उपहारगृहांचा विचार केला तर गेल्या ४ महिन्यात त्यांचे सुमारे ४५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हॉटेल मालक कर्जाच्या ओझ्याखाली दबला जात असल्याने राज्य सरकारने याप्रश्नी तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.
जळगाव शहरात उच्चश्रेणीतील सुमारे २५, मध्यम श्रेणीची ५० ते ५५ आणि साधारण श्रेणीतील सुमारे ८० ते ९० छोटी-मोठी हॉटेल्स आहेत. उपहारगृहांची संख्याही सुमारे १०० ते १२५ इतकी आहे. कोरोनामुळे २२ मार्चपासून राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याने उपहारगृहे आणि हॉटेल्स बंद पडली. तेव्हापासून या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. आज ना उद्या हॉटेल सुरू होतील, अशी आशा व्यावसायिकांना होती. मात्र, हॉटेल्स आणि उपहारगृहे सुरू झाली नाहीत. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करताना अनेक व्यवसायांना परवानगी दिली. हॉटेल बंद असले तरी हॉटेलमधून केवळ खाद्यपदार्थ पार्सल देण्यास परवानगी दिलेली आहे. परंतु, पार्सल सेवा सुरू असली तर नेहमीपेक्षा केवळ १० टक्के व्यवसाय होत आहे आणि खर्च मात्र कमी होत नाही, असे जळगावातील हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.
हेही वाचा -एकनाथ खडसेंना 'महावितरण'चा झटका; पाठवले 1 लाख 4 हजारांचे वीजबिल
हॉटेल सुरू असले की चांगला व्यवसाय होत असतो. परंतु, पार्सल जेवण नेणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. सरकारने जरी हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी तो प्रत्यक्षात काहीच उपयोगाचा नाही, असे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. याबाबत बोलताना जळगाव हॉटेल्स अँड टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशनचे सचिव संजय जगताप यांनी सांगितले की, हॉटेलची केवळ पार्सल सेवा सुरू आहे. त्यासाठी हॉटेल सुरू ठेवावे लागते. स्वयंपाकी, कर्मचारी तसेच वेटर आदी कर्मचारी ठेवावे लागातत. हॉटेलचे मासिक भाडे, कर्जाचे हप्ते, वीज बिल आदी भरावे लागते. तो खर्च पार्सलमुळे होणाऱ्या व्यवसायातून भरून निघत नाही. सध्या जेमतेम १० टक्के व्यवसाय होत आहे. इतर उद्योगांप्रमाणे सरकारने हॉटेल व्यवसायाला उद्योगाचा दर्जा दिलेला नाही. हॉटेल्स व्यवसायावर अनेक घटक एकमेकांवर अवलंबून असतात. त्या सर्वांवर आर्थिक संकट कोसळले आहे, असेही जगताप यावेळी म्हणाले.
हॉटेलचालक नियमावली पाळण्यास तयार -