जळगाव - जिल्ह्यासह शहरात कोरोनाच्या संसर्गाचा वेग कायम आहे. आता तर जिल्ह्याचा मृत्यूदरही वाढत चालला आहे. एकीकडे अशी भयावह परिस्थिती असली तरी जळगावकर नागरिकांना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी खंडित व्हावी, म्हणून राज्य शासनाने 14 एप्रिलच्या रात्रीपासून पुढील 15 दिवस सर्वत्र कडक निर्बंध घातले आहेत. पण बेफिकीर जळगावकरांनी हे निर्बंध अक्षरशः धाब्यावर बसवले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या बहाण्याने नागरिक अगदी बिनधास्तपणे घराबाहेर रस्त्यांवर हिंडत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक प्रशासनाने देखील केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे जळगावात खरंच निर्बंध आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जळगावात राज्य शासनाच्या निर्बंधांची ऐशीतैशी... बेफिकीर नागरिक बिनधास्त फिरताय रस्त्यांवर! - jalgaon marathi news
जळगाव जिल्ह्यासह शहरात कोरोनाच्या संसर्गाचा वेग कायम आहे. आता तर जिल्ह्याचा मृत्यूदरही वाढत चालला आहे. एकीकडे अशी भयावह परिस्थिती असली तरी जळगावकर नागरिकांना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे.
जळगावात राज्य शासनाच्या निर्बंधांची ऐशीतैशी
विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई नाही-
राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने राज्यात कडक निर्बंध लादले आहेत. पण जळगाव शहरातील चित्र वेगळेच आहे. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर वर्दळ सुरू आहे. नागरिक अत्यावश्यक सेवा तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या बहाण्याने रस्त्यावर फिरत आहेत. शहरातील काही प्रमुख चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, वाहनांची तपासणी होत नाही. बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची विचारणा होत नाही. कारवाई केली जात नाही. याचाच गैरफायदा नागरिक घेत आहेत. दररोज सकाळी व सायंकाळी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. दुपारी कडाक्याच्या उन्हामुळे वर्दळ काहीशी मंदावते. सायंकाळी मात्र, स्थिती बदलते. रात्रीच्या वेळीही काही नागरिक बाहेर असतात.
पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची गरज-
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी बाहेर फिरणाऱ्यांवर ज्या प्रमाणे कारवाई केली जाते, सक्तीची अँटीजन टेस्ट केली जाते, त्याच धर्तीवर दिवसाही कारवाई होण्याची गरज आहे. शहरातील मोठे व्यापारी संकुले बंद असली तरी फळे, भाजीपाला, दूध खरेदीच्या नावाखाली नागरिक बाहेर पडत आहेत. अशा नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत.
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मर्यादित वेळ हवी-
कोरोनाचा वाढत जाणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील अनेक शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दररोज मर्यादित वेळ दिला जात आहे. अशाच पद्धतीने जळगावात देखील उपाययोजना करण्याची गरज आहे. दूध, किराणा माल अशा प्रकारच्या खरेदीसाठी प्रशासनाने सकाळी ते दुपारी मर्यादित तास मुभा दिली पाहिजे. यामुळे गर्दी टाळता येऊ शकते. शहरातील सुभाष चौक, बळीराम पेठ, दाणाबाजार अशा ठिकाणी फळे व भाजीपाला विक्रेत्यांच्या हातगाड्या दिवसभर उभ्या असतात. अनेक दुकानांमध्ये वस्तुंच्या खरेदीसाठी गर्दी होते. हे टाळण्यासाठी दररोज फक्त काही तासांची मर्यादा हाच मार्ग स्वीकारण्याची गरज आहे. अन्यथा राज्य शासनाने लादलेल्या कडक निर्बंधांचा काहीएक उपयोग होणार नाही. शिवाय कोरोनाची साखळी न तुटता संसर्ग कायम राहील, यात शंका नाही.