महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्हा भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर; पदाधिकाऱ्यांच्या मनमानीचे पडसाद उमटले नेत्यांसमोर

वर्चस्वाच्या राजकारणातून जळगाव जिल्हा भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत गोंधळ झाला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आणि शाईफेकीचा प्रकार घडला.

jalgaon-district-president-elects-meeting-led-to-controversy-at-the-meeting
जळगाव जिल्हा भाजपतील धुसफूस चव्हाट्यावर

By

Published : Jan 10, 2020, 9:16 PM IST

जळगाव -वर्चस्वाच्या राजकारणातून जळगाव जिल्हा भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. गटातटात विभागले गेलेले भाजपचे काही पदाधिकारी मनमानी करत असून त्यामुळे 'पार्टी विथ डिफरन्स' असलेल्या भाजपच्या शिस्तीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी आयोजित विशेष बैठकीत भाजपतील बेशिस्त निदर्शनास आली. भुसावळ शहराध्यक्ष निवडीवेळी घडलेल्या वादाचे पडसाद थेट केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच उमटले. या गोंधळात 2 गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी तसेच शाईफेकीचा प्रकार घडला.

जळगाव जिल्हा भाजपतील धुसफूस चव्हाट्यावर

भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकीच्या प्रक्रियेत आज जळगाव जिल्हाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरला होता. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी सकाळी 11ची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी होती. तब्बल 18 जणांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले होते. बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी नेत्यांनी आवाहन करून देखील इच्छुक माघार घेण्यास तयार नसल्याने नेत्यांना बैठक लांबवावी लागली. शहरातील अजिंठा विश्रामगृहात रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर आदी नेत्यांनी बंद खोलीत एकत्रित बैठक घेत चर्चा केली. त्यावेळी काही इच्छुकांनी नेत्यांशी झालेल्या चर्चेअंती माघारीची तयारी दर्शविली. दुपारी 2 वाजता बैठक सुरू झाल्यावर मात्र, जिल्हाध्यक्ष निवडीचा विषय बाजूला राहिला. भुसावळ येथील काही कार्यकर्त्यांनी तेथील शहराध्यक्ष निवडीचा मुद्दा उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली. भुसावळ शहराध्यक्ष निवडीत निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्याच व्यक्तीला संधी दिली आहे. या प्रकारामागे भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा एकनाथ खडसे यांचे समर्थक सुनील नेवे यांचा हात आहे, अशी तक्रार या कार्यकर्त्यांनी केली. तशा आशयाचे निवेदन दानवेंना द्यायचे असल्याची त्यांनी विनंती केली. दानवे आणि महाजन यांनी निवेदन स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर मात्र, नेवे यांच्या बाजूने काही कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे 2 गटात शाब्दिक वाद झाला.

पुन्हा रंगले नाराजीनाट्य -

गोंधळानंतर दुसऱ्यांदा बैठक सुरू झाल्यावर पुन्हा इच्छुकांचे नाराजीनाट्य रंगले. जिल्हाध्यक्ष पदासाठी एकूण 18 जणांनी अर्ज केले होते. त्यातील 9 जणांनी नेत्यांच्या विनंतीवरून माघार घेतली. पण उर्वरित 9 जण मात्र, आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे दानवे आणि महाजन यांना बैठक थांबवावी लागली. इच्छुक 9 जणांना सोबत घेऊन दोन्ही नेते एका बंद खोलीत गेले. त्याठिकाणी तब्बल तासभर काथ्याकूट झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी आमदार हरीभाऊ जावळे यांच्या नावावर एकमत झाले. त्यानंतर बैठक सुरू झाल्यावर दानवेंनी जावळेंच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

मारहाण, शाईफेक करणाऱ्यांवर कारवाई होणार -

बैठकीत घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. त्याचे कुणीही समर्थन करणार नाही. ही बाब पक्ष शिस्तीच्या विरोधात आहे. त्यामुळे बैठकीत मारहाण, शाईफेक करणाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस आम्ही प्रदेश कमिटीकडे करणार आहोत, अशी माहिती बैठकीनंतर रावसाहेब दानवे यांनी दिली. गिरीश महाजन यांनी देखील पत्रकारांशी बोलताना या विषयाचा पुनरुच्चार केला.

अखेर जिल्हाध्यक्षपदी हरिभाऊ जावळे -

नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी अखेर माजी आमदार हरिभाऊ जावळे यांची वर्णी लागली आहे. पक्षात शांत, संयमी आणि अभ्यासू अशी प्रतिमा असलेले जावळे हे खडसे समर्थक मानले जातात. परंतु, गिरीश महाजन गटात त्यांना मानणारा वर्ग आहे. त्यांच्या निवडीमागे पक्ष संघटन मजबुतीसाठी फायदा होईल, हा भाजपचा हेतू दिसून येत आहे. माजी खासदार, माजी आमदार म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे. आता जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details