महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात पहिल्या दिवशी 700 आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळेल लस - corona vaccination news

जळगाव जिल्ह्यात 7 केंद्रावर शनिवारी आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रावर 100 असे एकूण 700 आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

Jalgaon district, 700 health workers will get vaccinated on the first day
जळगाव जिल्ह्यात पहिल्या दिवशी 700 आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळेल लस

By

Published : Jan 15, 2021, 7:56 PM IST

जळगाव -जिल्ह्यात उद्यापासून (शनिवार) 7 केंद्रावर कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रावर 100 असे एकूण 700 आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज (शुक्रवारी) सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील उपस्थित होते.

19 हजार 951 आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची झालीय नोंद -

जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले की, जिल्ह्यात कोविड-19 लसीकरण मोहीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव, म.न.पा अंतर्गत डी. बी. जैन हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा आणि जामनेर तसेच ग्रामीण रुग्णालय, पारोळा व चाळीसगाव आणि न. पा. भुसावळ अशा 7 केंद्रांवर राबविण्यात येईल. या मोहिमेसाठी प्रति लसीकरण केंद्र 100 लाभार्थी याप्रमाणे एकूण 700 आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. या लसीकरण मोहिमेसाठी जळगाव जिल्ह्यात एकूण 19 हजार 951 आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. त्यासाठी ‘कोविशील्ड’ या लसीचे 24 हजार 320 डोस (2432 Vial) जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रशासन आहे सज्ज-

जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येणाऱ्या सात केंद्रांवर सर्व आवश्यक व्यवस्था सुसज्ज करण्यात आली आहे. नियुक्त कर्मचारी आणि लस टोचकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व केंद्रावर लसीकरणाबाबत माहिती अद्ययावत करण्यासाठी इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व बाबींची तपासणी आज करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोविड-19 लसीकरण मोहिमेचे उदघाटन झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार आहे.

अफवा पसरवल्यास होणार कारवाई -

लाभार्थ्यास लस घेतल्यावर कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास आरोग्य केंद्र/कोरोना कंट्रोल रुम 0257-2226611 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. लाभार्थ्यांस जर काही त्रास झाला तर त्याठिकाणी उपचाराची आवश्यक साधनसामुग्रीची AEFI किटही उपलब्ध असेल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने कोणीही चुकीची माहिती अथवा अफवा पसरवू नये. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details