जळगाव - एसटीची बससेवा शुक्रवार (ता.२२) पासून सुरू करण्याचे आदेश राज्य परिवहन महामंडळाने जळगाव विभागाला दिले आहेत. बुधवारी सायंकाळी हे आदेश प्राप्त झाले. त्यानुसार सुरुवातीस ही सेवा केवळ जिल्ह्यांतर्गत असेल. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत या बसेस सोडल्या जाणार आहेत. प्रत्येक आगाराच्या फेऱ्यांसंबंधीचे नियोजन विभागाने केले आहे. तरीही, बससेवा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची अंतिम परवानगी मिळाल्यानंतरच ही सेवा सुरू होईल, अशी माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी दिली.
कोरोनाच्या संसर्गाचा धोका असल्यामुळे राज्यभरात लॉकडाऊन सुरू आहे. बससेवा बंद आहेत. तब्बल ६२ दिवसांनी बससेवा सुरू होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील काही आगारांना जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यानुसार, आगाराने शुक्रवारी बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान बससेवेसाठी वाहक, चालकांचे नियोजनही केले आहे. फेऱ्यांची यादी तयार केली असून, या फेऱ्यांबाबत व कंटेन्मेंट झोन असलेल्या तालुक्यांना या बसेस सोडण्याबाबत आज जिल्हाधिकारी यांचे सोबत होणाऱ्या बैठकीत परवानगी घेतली जाणार आहे. त्यानंतरच ही बससेवा सुरू होईल, असे देवरे यांनी सांगितले.