जळगाव - भाजप हा संघर्ष करून सत्तेपर्यंत आलेला पक्ष आहे. तसेच पक्षाची एक विचारसरणी असून ती विचारसरणी सत्ता मिळविण्यासाठी दूर करू नका, इतर पक्षातून नेत्यांना आयात करत असताना पक्षासाठी आयुष्य झिजवलेल्या ज्येष्ठ नेत्यांना देखील कायम सोबत घ्या, अशा शब्दात मंगळवारी ब्राह्मण सभेत झालेल्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नेत्यांसमोर भावना व्यक्त करण्यात आल्या. एकनाथ खडसे पक्ष सोडून गेले म्हणून भाजपा जिल्ह्यातून हद्दपार होईल, असे कदापि होऊ देणार नाही. खडसेंच्या अनुपस्थितीत पक्ष संघटना वाढवून दाखवू, असाही विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात नेत्यांना दिला.
'सत्तेसाठी उपरे नेते घेताना ज्येष्ठांना डावलू नका'... खडसेंच्या पक्षांतरानंतर भाजपात हालचालींना वेग
एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर 'डॅमेज कंट्रोल' रोखण्यासाठी मंगळवारी बळीराम पेठेतील ब्राह्मण सभेत प्रांत संघटक विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, महापौर भारती सोनवणे, आणि अन्य नेते उपस्थित होते.
एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर 'डॅमेज कंट्रोल' रोखण्यासाठी मंगळवारी बळीराम पेठेतील ब्राह्मण सभेत प्रांत संघटक विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, महापौर भारती सोनवणे, माजी आमदार स्मिता वाघ, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर आदी उपस्थित होते. खडसे यांनी भाजपा सोडल्यानंतर पक्षांतर्गत परिणामांवर या मेळाव्यात मंथन झाले.
पक्षसंघटनेवर परिणाम नाही
एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडल्यामुळे जिल्ह्यात भाजपच्या पक्ष संघटनेवर फारसा परिणाम होणार नाही, असे विजय पुराणिक यांनी सांगितले. पक्ष हा नेत्यांमुळे नाही तर कार्यकर्त्यांच्या कामामुळे चालत असतो. एक नेता गेला तर त्याची जागा दुसरा नेता घेत असतो. पक्ष संघटनेचे काम अविरत चालू ठेवण्याचे आवाहन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
जनतेची कामे करा, खडसेंसारखे कितीही नेते गेले तरी फरक पडणार नाही
मेळाव्यात मत मांडताना भाजप नगरसेविका पार्वताबाई भिल यांनी सांगितले की, भाजपाने केवळ जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा. जनतेचे प्रश्न सोडवले तर खडसेंसारखे कितीही नेते भाजपा सोडून गेले तरी पक्ष विजयी पताका लावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठांना विश्वासात घ्यायला हवे
कमलाकर रोटे यांनी सांगितले की, पक्ष संघटना वाढवत असताना नवीन युवकांना संघटनेत स्थान दिले पाहिजे. त्याचप्रमाणे, जुन्या नेत्यांना देखील विश्वासात घ्यायला हवे. काही कार्यकर्त्यांनी नवीन युवकांना पक्षात समाविष्ट करून घण्यासाठी भाजयुमो, अभाविप सारख्या संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. पक्षाकडून कार्यकर्त्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यशाळेवर देखील भाजपा कार्यकर्त्यांनी नेत्यांना सुनावले. पंचायत समिती सदस्य अॅड. हर्षल चौधरी यांनी प्रशिक्षणाची गरज ही नेत्यांना असून, कार्यकर्ता हा पक्षाचे काम मनापासून करत आहे, अस सांगितले.