जळगाव - आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी नदीवर गेलेल्या ८ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) सकाळी जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकी खुर्द गावात घडली.
आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी नदीवर गेलेल्या नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू - jamner
आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी कुटुंबातील व्यक्तींसह नातेवाईक गावातील नदीकाठी गेले होते. यावेळी कुटुंबातील लहान मुलगा नदीत उतरला. मात्र, त्याला पोहता येत नसल्याने त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला.
मयंक संतोष बऱ्हाटे (वय ८) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. मयंकचे आजोबा वसंत बऱ्हाटे यांचे १० दिवसांपूर्वी निधन झाले होते. आज त्यांचा दशक्रियाविधी कार्यक्रम होता. त्यासाठी बऱ्हाटे कुटुंबीय नातेवाईकांसोबत गावातील नदीकाठी गेले होते. त्यानंतर मयंक नदीच्या पाण्यात उतरला. मात्र, पोहता येत नसल्याने पाण्यात बुडाला. मयंक पाण्यात बुडल्याचे लक्षात आल्यावर दशक्रिया विधीसाठी आलेल्या काही लोकांनी धाव घेत त्याला पाण्यातून बाहेर काढले. तातडीने त्याला जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेमुळे वाकी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.