जळगाव - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 दरम्यान ही परीक्षा होईल. यावर्षी जळगाव जिल्ह्यातील 49 हजार 403 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी जिल्हाभरात 71 परीक्षा केंद्र असणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने प्रशासकीय स्तरावर योग्य ती उपाययोजना करण्यात आली आहे.
हेही वाचा -जळगावात अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; 2 दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता
इयत्ता बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हा टप्प्या पार केल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या करिअरची पुढची दिशा ठरत असते. म्हणूनच बारावीची परीक्षा महत्त्वपूर्ण मानली जाते. यावर्षी परीक्षा निकोप आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 71 परीक्षा केंद्रांपैकी 13 परीक्षा केंद्र ही उपद्रवी तसेच संवेदनशील आहेत. या केंद्रांवर 7 भरारी पथकांची नजर असणार आहे. जिल्हास्तरीय पथकांना तालुकास्तरीय भरारी पथके मदतीला असतील. परीक्षा केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रत्येक विद्यार्थ्याची कसून तपासणी करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
...अन्यथा पर्यवेक्षकावर कारवाई
परीक्षा केंद्रातील एखाद्या वर्गात 5 पेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले तर संबंधित पर्यवेक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे. दुसरीकडे, परीक्षा केंद्रांच्या आवारातील झेरॉक्स दुकाने परीक्षेच्या काळात बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.