जळगाव -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. दोन आठवड्यांपूर्वी 'ग्रीन झोन'मध्ये असलेला जळगाव जिल्हा आता कोरोना बाधितांची संख्या अचानक वाढल्यामुळे 'रेडझोन'मध्ये आलाय. धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर देखील राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकूण 53 कोरोना पॉझिटिव्ह असून त्यापैकी 13 रुग्णांचा बळी गेला आहे. एका रुग्णाने कोरोनावर मात केली असून, एवढीच काय ती जिल्हावासीयांसाठी दिलासादायक गोष्ट आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग वाढीला नागरिकांची बेफिकिरी आणि स्थानिक प्रशासनाचा हलगर्जीपणा देखील तितकाच कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी रात्री जळगावातील समता नगरातील एका 50 वर्षीय पुरुषाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
कोरोनाने जळगाव जिल्ह्यात 'असे' पसरले हातपाय! - कोरोना व्हायरस
जळगाव जिल्ह्यातील 28 मार्च रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण जळगाव शहरात आढळला. जळगावातील मेहरूण परिसरातील एकाला कोरोनाची लागण झाली होती. मुंबई, सौदी अरेबिया अशी या रुग्णाची ट्रॅव्हल्स हिस्ट्री असल्याचे समोर आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे जाणवत असताना देखील प्रकृतीकडे दुर्लक्ष केले होते.
जळगाव जिल्ह्यातील 28 मार्च रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण जळगाव शहरात आढळला. जळगावातील मेहरूण परिसरातील एकाला कोरोनाची लागण झाली होती. मुंबई, सौदी अरेबिया अशी या रुग्णाची ट्रॅव्हल्स हिस्ट्री असल्याचे समोर आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे जाणवत असताना देखील प्रकृतीकडे दुर्लक्ष केले होते. त्रास वाढल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर 4 दिवसांनी म्हणजेच 2 एप्रिल रोजी जळगाव शहरात दुसरा रुग्ण आढळला होता. शहरातील सालारनगरातील एका वृद्धाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. चिंतेची बाब म्हणजे या रुग्णाची कोणतीही ट्रॅव्हल्स हिस्ट्री नव्हती. मेहरूण आणि सालारनगर हे परिसर जवळ जवळ असल्याने आधीच्या कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याने त्याला लागण झाली असावी, अंदाज होता. मात्र, त्याचा लागलीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. कोरोनाचा हा जिल्ह्यातील पहिला बळी होता. त्यानंतर, जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील एका वृद्धेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. ही महिला ग्रामीण भागातील कोरोनाची पहिली रुग्ण होती. या महिलेची ट्रॅव्हल्स हिस्ट्री तपासली असता ती औरंगाबाद, मुंबईला जाऊन आलेली होती. त्यानंतर अमळनेर शहरातील साळीवाडा भागातील एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली. या दाम्पत्याचा मुलगा पुण्याहून घरी आलेला होता. त्याच्यापासून दाम्पत्याला लागण झाल्याचा संशय आहे. या दाम्पत्याला कोरोनासदृश लक्षणे जाणवत असल्याने त्यांना 18 एप्रिलला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात महिलेला श्वसनाचा त्रास अधिक होत असल्याने तिचा 19 एप्रिलला मृत्यू झाला होता. तोवर महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नव्हता. या महिलेला मृत्यू न्यूमोनियामुळे झाल्याचे कारण सांगून जळगाव महापालिकेने तसा मृत्यू दाखला देत मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला होता. तिच्या अंत्ययात्रेत अनेक नातेवाईक सहभागी झाले आणि पुढे अमळनेरवर कोरोनाचे संकट ओढवले. या महिलेच्या संपर्कात आलेल्यांपैकी अनेकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. चिंतेची बाब म्हणजे, कोरोना संक्रमित असलेले जळगाव, अमळनेर, भुसावळ, पाचोरा आणि चोपडा येथील अनेकांचे अहवाल येणे बाकी आहे, त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या अजून वाढण्याची दाट शक्यता आहे.
पाचोरा, भुसावळही कोरोनाच्या विळख्यात-
जळगाव शहरासह अमळनेरात कोरोना उद्रेक झाल्यानंतर पुढे भुसावळ आणि पाचोरा शहरातही कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत भुसावळात 9 तर पाचोऱ्यात 8 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. चोपडा तालुक्यातही 2 रुग्ण आढळले आहेत. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक 23 रुग्ण अमळनेर शहरात आहेत. कोरोना बळींची संख्याही अमळनेरात अधिक आहे.
...तोवर परिस्थिती गेली हाताबाहेर-
दुसरीकडे, स्थानिक प्रशासनानेही तत्काळ उपाययोजना न केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. जिल्हाबंदी असताना देखील जळगाव जिल्ह्यात पुणे, मुंबई तसेच सुरत अशा संक्रमित शहरांमधून मोठ्या प्रमाणावर नागरिक चोरी-छुपे दाखल झाले. अशा नागरिकांवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नव्हते. जिल्ह्यात संसर्ग वाढल्यानंतर प्रशासन हादरले. त्यानंतर संक्रमित परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले, जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग सील करण्यात आले. परंतु, तोवर परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती.
जळगावात आणखी एक कोरोनाबाधित
जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात स्वॅब घेतलेल्या 38 कोरोना संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. यापैकी 37 रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. तर एका व्यक्तीचा तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. पाॅझिटिव्ह आढळलेला 50 वर्षीय पुरूष हा यापूर्वी पाॅझिटिव्ह आढळलेल्या समतानगरातील महिलेचे वडील आहेत. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील 11 व्यक्तींचा समावेश आहे.
- कोरोना अपडेट्स-
एकूण बाधितांची संख्या 53
जळगाव- 10
अमळनेर- 23
भुसावळ- 9
पाचोरा- 8
चोपडा- 2
मलकापूर- 1
मृतांची संख्या- 13
जळगाव- 2
अमळनेर- 6
भुसावळ- 2
पाचोरा- 2
चोपडा- 1