जळगाव -जिल्ह्यातील रावेरचे भाजप आमदार हरिभाऊ जावळे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण तसेच संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. हरिभाऊ जावळेंना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देऊन भाजपने एकनाथ खडसे यांना विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीत शह देण्याची खेळी खेळली आहे, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद उपाध्यक्ष पदी हरिभाऊ जावळे यांची नियुक्ती जावळेंच्या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा
राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातर्फे उपसचिव सु. स. धपाटे यांनी यांच्या स्वाक्षरीनिशी जावळेंच्या नियुक्तीचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असून तीन वर्षांसाठी ही नियुक्ती आहे. मात्र, राज्य शासनाची मर्जी असेल तोपर्यंत हे पद त्यांच्याकडे राहणार आहे.
जावळेंना पद आणि खडसेंना शह ?
हरिभाऊ जावळेंना हे महत्वाचे पद देऊन भाजपने माजीमंत्री एकनाथ खडसे यांना शह दिल्याचे बोलले जात आहे. खडसे हे जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते तर आहेत, शिवाय ते लेवा समाजाचेही नेते आहेत. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लेवा समाजाचे भाजपतीलच रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल, अशी तेव्हा चर्चा होती. मात्र, त्यावेळी ती चर्चाच ठरली होती. परंतु, आता विधानसभेच्या निवडणुकीस काही महिने शिल्लक असताना अंतिम टप्प्यात त्यांना कॅबिनेट मंत्रिदर्जाचे कृषी शिक्षण व संशोधन समितीचे उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. माध्यमातून एकनाथ खडसे यांना विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीत शह देण्याची खेळी खेळली जात आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
जावळे यांना पक्षाने न्याय दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंद
हरिभाऊ जावळे हे रावेर-यावलचे आमदार आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे दोनवेळा खासदार म्हणूनही ते निवडून आले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत पक्षाने त्यांची लोकसभेची उमेदवारी कापली होती. तेव्हा त्यांना रावेर विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. या मतदारसंघातून ते निवडून आले. आमदार जावळे हे लेवा पाटील समाजाचे आहे. माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांच्याच मुक्ताईनगर मतदारसंघाजवळ त्यांचा रावेर-यावल विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे जावळेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुका लागण्याच्या अखेरच्या टप्प्यात कॅबिनेट मंत्री दर्जाचे कृषी, शिक्षण व संशोधन समितीचे उपाध्यक्षपद भाजपने हरिभाऊ जावळेंना दिले आहे. अखेरच्या टप्प्यात का होईना, जावळे यांना पक्षाने न्याय दिल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यात आनंद व्यक्त होत आहे.