जळगाव - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मतदानाची प्रक्रिया घेण्यात येत असून मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून येत आहे. नवमतदार देखील हिरीरीने मतदान प्रक्रियेत सहभागी होत आहेत. सर्वांचा कल हा भाजप-सेना युतीकडे असल्याचे दिसून येत असल्याने राज्यात महायुतीचेच सरकार येईल, असा ठाम विश्वास राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
लोकसभेची ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी विधानसभेची पायाभरणी - गुलाबराव पाटील
सर्वांचा कल हा भाजप-सेना युतीकडे असल्याचे दिसून येत असल्याने राज्यात महायुतीचेच सरकार येईल, असा ठाम विश्वास राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे आले असता 'ई- टीव्ही भारत'शी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजप आणि सेनेसाठी चांगले सकारात्मक वातावरण आहे. आम्ही युतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात असल्याने आम्हाला लढत फार कठीण नाही. आम्हाला सकारात्मक वातावरण असल्याने राज्यात निश्चितच महायुतीचे उमेदवार अधिक संख्येने निवडून येतील, असेही ते म्हणाले.
ही तर विधानसभेची पायाभरणी-
लोकसभेची निवडणूक आम्ही युतीच्या माध्यमातून लढत आहोत. युतीमुळे आता आम्ही भाजपला सहकार्य करत आहोत. पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला आम्हाला सहकार्य करावे लागेल. आता आम्ही प्रत्यक्ष मतदारांमध्ये फिरत असल्याने आम्हाला आमची ताकद काय, आम्ही कोठे कमी पडतोय, याची माहिती होत आहे. आम्ही जेथे कमी पडतोय, त्या बाबी भरून काढू. लोकसभेची ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी विधानसभेची पायाभरणी आहे. विधानसभा निवडणुकीची ही एकप्रकारे सेमी फायनल म्हणता येईल, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.