जळगाव-जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यात यावी, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या गोळ्या-औषधींसह २ हजार पीपीई किटचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कॅबिनेटच्या बैठकीत केल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीमधून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्याची मागणी कॅबिनेटच्या बैठकीत केली असून तिला राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. लॅबसाठी लवकर प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आमदार फंडातून ५० लाख रुपये कोरोनासाठी देता येणार आहेत. केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नाही. धान्य देण्याबाबत सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे.
संचारबंदीच्या काळात पोलीस यंत्रणेवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे पोलिसांना मदत म्हणून बंदोबस्तासाठी होमगार्डसची नियुक्ती करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरू करण्यात यावीत. कामगारांची उपासमार होणार नाही. त्यासाठी कामगार कल्याण मंडळाने मदत करावी, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत, असेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
जळगाव जिल्ह्यात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयात दाखल आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा जळगाव जिल्ह्यातील स्थिती चांगली आहे. मात्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्य जवळच असल्याने या राज्यांच्या सीमा बंद करण्यात याव्यात, अशीही मागणी सरकारकडे केल्याचे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाग्रस्ताला लागण कशी झाली, याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारणा केली. त्या रुग्णाला कोरोनाची लागण कशी झाली, हे आजपर्यंत कळलेले नाही. कोरोनाशी लढत असल्याने सध्याच्या बिकट परिस्थितीला सामोरे जावेच लागेल. मात्र, याबाबत चौकशी करुन माहिती घेण्यात येईल. सद्यस्थितीत चौकशी करण्यापेक्षा काम करुन घेणे महत्त्वाचे आहे, असे उत्तर देऊन त्यांनी अधिक बोलणे टाळले. बैठकीत जळगाव जिल्ह्यातील केळीबाबत प्रश्न मांडला. केळीच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची केळी खरेदी करण्याबाबत जैन इरिगेशन सिस्टीम्सला विनंती करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.