जळगाव -'ज्यावेळी बाबरी मशिदीचा ढाचा ढासळला, तेव्हा भाजपच्या 72 नेत्यांनी बाबरीचा ढाचा आम्ही पाडला, हे तेव्हा का कबूल केले नाही. गिरीश महाजन यांनी आधी याचे उत्तर द्यावे, मग हिंदुत्त्व सिद्ध करावे', अशा शब्दांत शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे शुक्रवारी जळगावात होते. अजिंठा शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले. बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी सुरू असलेले अटकसत्र, मुंबईत शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली चकमक अशा विषयांवरही गुलाबराव पाटील यांनी मत मांडले.
गिरीश महाजनांनी काय केली होती टीका? -
भाजपा नेते गिरीश महाजन यांनी काल जळगावात असताना राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली होती. 'शिवसेना आपल्या मूळ तत्वांपासून बाजूला जाऊन अशी भरकटेल, असा आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता. काँग्रेस व एमआयएमच्या पुढे जाऊन शिवसेनेने हिंदुत्व विरोधी काम करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेची इतकी अधोगती कधीही झाली नाही, ती आज बघत आहोत', अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी टीकास्त्र डागले होते.
काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील? -
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपाच्या 72 नेत्यांनी तेव्हा बाबरीचा ढाचा आम्ही पाडला, हे का कबूल केले नाही. तेव्हा एकच बाप होता बाळासाहेब ठाकरे; ज्यांनी सांगितले पाय नाही हात आहे, हात नाही पाय आहे, याचे उत्तर गिरीश महाजन यांनी द्यावे, असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले.