जळगाव -विरोधी पक्षनेता म्हणून स्वतःचे अस्तित्त्व दाखवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची धडपड सुरू आहे. त्यामुळे ते काहीही निर्थरक वक्तव्य करत आहेत, अशा शब्दात शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. रविवारी दुपारी जळगावातील अजिंठा विश्रामगृहात मंत्री गुलाबराव पाटील 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते.
मंत्री गुलाबराव पाटील बोलताना... कोल्हापूर दौऱ्यावर असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर टीका केली होती. कोरोनाच्या नियंत्रणात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णयच घेत नसल्याने राज्याची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरून, मंत्रालयातून किंवा अन्य कुठूनही निर्णय घ्यावेत पण निर्णय घ्यावे, अशी टीका केली होती. फडणवीस यांच्या टीकेला आज गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
ते पुढे म्हणाले, की विरोधी पक्षनेता म्हणून स्वतःचे अस्तित्त्व दाखवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची धडपड सुरू आहे. त्यांच्या टीकेला काहीही अर्थ नाही. सत्ताधाऱ्यांवर टीका-टिप्पणी करणे, जे काम होत नाही ते सांगणे, हे विरोधी पक्षनेत्याचे कामच असते. पण राज्यात काय होतंय आणि काय नाही यापेक्षा जर राज्याची परिस्थिती लक्षात घेतली तर कुणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाईट म्हणेल, अशी स्थिती आपल्या महाराष्ट्राची नाही. पण विरोधी पक्षनेता म्हणून अशी टीका करत राहणे त्यांच्यासाठी गरजेचे असते, असा चिमटा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी फडणवीस यांना काढला.
तुकाराम मुंढेंच्या अनुभवाचा आम्ही फायदा घेऊ -
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिका आयुक्त पदावरून बदली झाली असून, त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. या विषयावर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, तुकाराम मुंढे हे अनुभवी आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या अनुभवाचा आम्ही फायदा करून घेऊ. जिथे जिथे त्यांच्या चांगल्या कामांची गरज पडेल तिथे तिथे मदत घेऊ. एक डॅशिंग स्वभावाचा अधिकारी आमच्या विभागात येत आहे, त्यामुळे आमच्या विभागात निश्चितच सुधारणा होतील, अशी आशा असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.