जळगाव- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी ग्रीन झोनमध्ये असलेला जळगाव जिल्हा आता रेडझोनमध्ये आला आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाच्या नियंत्रणात कमी पडत आहे. आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही. जिल्हा शल्यचिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यातील विसंवाद हीच जिल्ह्यातील कोरोना वाढीची प्रमुख कारणे असल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधींनी जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी दुपारी जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची तातडीची बैठक बोलावली होती.
या बैठकीत लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय अधिकारी तसेच आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जळगावच्या महापौर भारती सोनवणे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, लता सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, डॉक्टर्स तसेच समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीलाच पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी कोरोनामुळे जिल्ह्यात उदभवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीवर बोट ठेवले. पालकमंत्री, जिल्हाधिकारी प्रयत्नशील असताना जिल्ह्यातील मृत्यूदर का जास्त आहे? याची कारणे शोधण्याची गरज आहे. आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांमध्ये विसंवाद आहे. त्यांचे एकमेकांशी पटत नाही. परस्परांशी मतभेद आहेत. एकीकडे जिल्ह्यात कोविड रुग्णालये तयार केली जात आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी आहे. ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याचे सांगितले जाते, मग जिल्ह्यातील मृत्यूदर का कमी होत नाही, असा सवाल थेट पालकमंत्र्यांना करत आमदार किशोर पाटील यांनी सेनेला 'घरचा आहेर' दिला.