जळगाव - जागतिक बाजारपेठ आर्थिक मंदीत सापडली आहे. त्यातच आता जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू असल्याने जागतिक बाजारपेठ अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकली आहे. कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे गेल्या दोन दिवसात शेअर बाजारात प्रचंड घसरण झालेली आहे. याचाच परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. सोन्याचे दर एकाच दिवसात तब्बल दीड हजार रुपयांनी खाली आले आहेत. सुवर्णनगरी असलेल्या जळगावात शुक्रवारी सराफ बाजाराला सुरुवात झाल्यानंतर सोन्याचे दर 42 हजार 300 रुपये प्रतितोळा होते.
सध्या सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. जळगावात बुधवारी सोन्याचे दर 44 हजार 200 रुपये प्रतितोळा होते. त्यानंतर गुरुवारी सोन्याचे दर 700 रुपयांनी घसरले. शुक्रवारी सराफ बाजार सुरू झाला तेव्हा हे दर अजून घसरले. शुक्रवारचा बाजार पुन्हा 1 हजार 200 रुपयांनी खाली आला. शेअर बाजार कोसळल्याने सोन्याचे दर खाली आले आहेत. शेअर बाजारातील घसरणीमुळे झालेले नुकसान म्हणजेच मार्जिन मनी भरून काढण्यासाठी गुंतवणूकदार सोन्यासह चांदीची विक्री करतात. गुरुवारी जगभरातील गुंतवणूकदारांनी सोने-चांदी विक्रीला काढल्याने सोन्याचे दर घसरले आहेत, अशी माहिती जळगावातील बाफना ज्वेलर्सचे संचालक पप्पू बाफना यांनी दिली.