जळगाव -गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वधारत असलेले सोन्याचे दर घसरले आहेत. टाळेबंदीच्या काळात 58 हजार रुपयांच्या घरात गेलेले सोन्याचे दर आता कमालीचे घसरले असून ते 45 हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. जळगावात गुरुवारी (दि. 4) सोन्याचे दर प्रतितोळा 44 हजार 950 रुपये इतके होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मोठ्या प्रमाणावर होत असलेली विक्री, कोरोना लसीकरणाला आलेला वेग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डॉलरचे अवमूल्यन व अमेरिकेने वाढवलेले व्याजदर या कारणांमुळे सोन्याच्या दरात घसरण नोंदवली जात आहे.
वर्षभराच्या कालावधीत कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर निर्बंध आल्याने सर्वच क्षेत्रात मंदीचे सावट होते. याच काळात मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या खरेदी व विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत होते. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर सट्टा बाजारातील सोने-चांदी या मौल्यवान धातूंच्या व्यवहारांमध्ये विशेष रस घेत होते. त्यामुळे सोने व चांदीचे दर वाढले होते. गेल्या वर्षभर हीच परिस्थिती कायम होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात ओसरल्यानंतर तसेच कोरोनाची लस आल्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर परिस्थिती सुधारू लागली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल होत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्क घटवल्याने सोन्याचे दर कमी झाले. त्यातच आता अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत आहे. परिणामी सोन्याचे दर कमी होत आहेत.
असे आहेत जळगावात दर
गुरुवारी (दि. 4) जळगाव सुवर्ण बाजारात सोन्याचे दर प्रतितोळा 44 हजार 950 रुपये (जीएसटी वगळता) असे नोंदवले गेले. तर 3 टक्के जीएसटीसह सोन्याचे दर 46 हजार 300 रुपयांपर्यंत होते. गुरुवारी दिवसभर हीच स्थिती कायम राहिली. काही महिन्यांपूर्वी उच्चांकी पातळीवर गेलेल्या सोन्याच्या दरांमध्ये झालेली ही मोठी घसरण मानली जात आहे.