जळगाव- राज्यातील सर्वच मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भाजप आणि सेना युतीत बंडखोरीचे वादळ उठले आहे. मात्र, बंडखोरी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी स्वतः प्रयत्नशील आहोत. सोमवारी दुपारपर्यंत सर्व काही स्थिर होईल. या प्रश्नी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 13 ऑक्टोबरला जळगावात सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी गिरीश महाजन रविवारी सायंकाळी शहरात आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा -प्रेमीयुगुलाचे मृतदेह खाणीत आढळले ; जळगावमधील घटना
महाजन पुढे म्हणाले, राज्यात सर्वत्र भाजप-सेना युतीला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे आपल्याला तिकीट मिळावे, असे दोन्ही पक्षांच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. याच विचारातून थोडी नाराजी आहे. मात्र, ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी स्वतः प्रयत्नशील आहोत. माझ्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी असल्याने मी कालच नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील बंडखोरांशी चर्चा केली. उद्या दुपारपर्यंत सर्व काही स्थिरस्थावर होईल. ज्यांना युतीचे ए. बी. फॉर्म देण्यात आले आहेत, तेच उमेदवार कायम असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.