जळगाव - गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गिरणा धरणात वरील बाजूने पाण्याची मोठी आवक सुरू आहे. खबरदारी म्हणून धरणातून गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आला आहे. म्हणून अनेक वर्षांनंतर गिरणा नदीला मोठा पूर आला आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठालगत असलेल्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे सध्या गिरणा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याची आवक वाढल्याने गिरणा धरणातून आज(रविवार) सकाळी ८.४० वाजता पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. काल रात्री मुसळधार पाऊस पडल्याने गिरणा धरणाचा प्रवाह ६६ हजार ८५३.६२ क्युसेकवरून ७४ हजार २८२ क्यूसेकपर्यंत वाढवण्यात आला. त्याचप्रमाणे मन्याड धरणातून ७ हजार ५०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सोडण्यात आला आहे. सद्यस्थितीत गिरणा आणि मन्याड धरणातून एकत्रितपणे तब्बल ८१ हजार ७८२ क्युसेकने गिरणा नदीपात्रात पाणी सुरू असल्याने नदीला पूर आला आहे.