जळगाव -कोरोनाच्या विषयावर राज्य सरकारचे नियंत्रण सुटले आहे. लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे, अशा परिस्थितीत सरकार कोरोनाच्या बाबतीत काय उपाययोजना करणार आहे? याबाबत चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. विद्यमान सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट आणण्यात आम्हाला स्वारस्य नसल्याची स्पष्टोक्ती माजीमंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आज जळगावात पत्रकारांशी बोलताना दिली. गिरीश महाजन हे फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू समजले जातात.
कोरोनाच्या उद्रेकामुळे जिल्ह्यातील हाताबाहेर गेलेली परिस्थिती तसेच शेतकऱ्यांच्या समस्या या विषयांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन आज दुपारी भाजपच्या शिष्टमंडळाने माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना दिले. यानंतर महाजन पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार गिरीश महाजन म्हणाले, की 'आमचे देखील प्राधान्य कोरोनाच्या समस्येलाच आहे. मात्र, या विषयावरचे सरकारचे नियंत्रण सुटले आहे. मुंबईची परिस्थिती गंभीर झाली आहे.'
येत्या चार-आठ दिवसात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. पाऊस आल्यास कोरोनाच्या रुग्णांची अवस्था काय होणार आहे? याची कल्पना न केलेली न बरी. पावसाळ्यात कोरोनाच्या रुग्णांना कुठे ठेवणार आहे? ही आमची सरकारला विचारणा आहे. यासाठीच आम्ही राज्यपालांना भेटलो होतो. या विषयासाठीच देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडे गेले होते. मात्र, राष्ट्रपती राजवट आणावी, सरकार बरखास्त करावे, यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचे स्वारस्य नसल्याचेही महाजन यावेळी म्हणाले.
शेतकरी वाऱ्यावर; सरकारची भूमिका दुटप्पी -
शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. कोरोनाचे निमित्त पुढे करीत सरकार शेतकऱ्यांकडे पाहण्यास तयार नाही. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारे सरकार त्यांच्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाही. मका क्विंटलभरदेखील खरेदी झाला नाही. शेतकऱ्यांना निम्मे भावात मका व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. त्याप्रमाणे कापसाचा प्रश्नही गंभीर झाला आहे. दररोज केवळ 10 ते 15 गाड्या कापूस खरेदी करुन शेतकऱ्यांची थट्टा सरकारने चालविली आहे. शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आल्याचे महाजन यांनी सांगितले.