महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावकरांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे; झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर गिरीश महाजन हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचा दावा करत महाजन समर्थकांनी शहरात ठिकठिकाणी 'महाराष्ट्राचे लोकनेते व भावी मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर लावले

भावी मुख्यमंत्री, गिरीश महाजन !

By

Published : May 30, 2019, 12:02 PM IST

Updated : May 30, 2019, 3:05 PM IST

जळगाव- लोकसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, जळगावात नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची नाही तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर गिरीश महाजन हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचा दावा करत महाजन समर्थकांनी शहरात ठिकठिकाणी 'महाराष्ट्राचे लोकनेते व भावी मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर लावले आहेत.

भावी मुख्यमंत्री, गिरीश महाजन ! जळगावात झळकले बॅनर; चर्चेला उधाण

2014 मध्ये एकनाथ खडसे मुख्यमंत्री होतील अशी आशा जळगावकरांना होती. मात्र, त्याचे ते स्वप्नच राहिले. आता 2019 मध्ये गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री पद मिळावे याचे डोहाळे पुन्हा एकदा जळगावकरांना लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातही खांदेपालटाचे जोरदार वारे वाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील विश्वासू सहकारी असलेले केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी प्रकृती अस्वस्थतेचे कारण पुढे करत आपल्याला मंत्रिपदाची जबाबदारी नको असल्याचे पत्र मोदींना दिले आहे. त्यामुळे मोदींच्या जवळचे मानले जाणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत फडणवीस यांच्या जागी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते, असा विश्वास महाजन यांच्या समर्थकांना आहे. हीच शक्यता गृहित धरून गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी शहरात, महाजन यांना महाराष्ट्राचे लोकनेते व भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा प्रदान करणारे बॅनर लावले आहेत. या विषयाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Last Updated : May 30, 2019, 3:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details