जळगाव - राज्यात सत्तांतर होताच भाजपची मुस्काटदाबी सुरू झाल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने या आर्थिक वर्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध योजनांतर्गत निधी मंजूर केला होता. परंतु, संबंधित निधीतून होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कामांना उद्धव ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे.
निधी मिळाल्यानंतरही ज्या कामांना कार्यादेश मिळालेले नाहीत; अशा कामांना ब्रेक लागल्याने भाजपचे संख्याबळ असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था डावलल्या जात असल्याचे चित्र आहे.
शासन आदेशामुळे जळगावातील १०० कोटींच्या कामांना ब्रेक जळगाव महापालिकेकडून शंभर कोटींची विविध कामे प्रस्तावित होती. मात्र, नव्या सरकारने दिलेल्या दणक्यामुळे आता ही कामे थांबली आहेत.
सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी मंजूर झालेल्या विकासकामांचे कार्यादेश देण्याची प्रक्रिया राज्य शासनाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात यावी, असे आदेश राज्यशासनाने दिले आहेत. तसेच जी कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, अशा कामांची यादी देथील शासनाकडे पाठवण्याचे सांगण्यात आले आहे. सरकारच्या या आदेशामुळे भाजप शासित स्थानिक स्वराज्य संस्थांची गोची झाली आहे.
सध्या जळगाव महापालिकेत 57 नगरसेवकांच्या बळावर भाजपचे निर्विवाद बहुमत आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन केले होते. यानंतर शहराच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात शंभर कोटींचा निधी मंजूर झाला.
या निधीतून 34 कोटींच्या कामांच्या निविदा देखील काढण्यात आल्या. मात्र, आता शासनाने या कामांना स्थगिती दिली आहे. विकासकामे थांबल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
जळगाव शहरात अमृत योजनेतून नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम देखील सुरू आहे. या कामामुळे शहरातील सर्वच भागातील रस्ते खोदून ठेवल्यामुळे महापालिका प्रशासनावर नागरिक नाराज आहेत. भुयारी गटार योजनेचेही काम प्रस्तावित असल्याने रस्ते दुरुस्ती थांबवण्यात आली आहे. आता शासनाच्या आदेशामुळे गटारे, नाल्यांवरील संरक्षक भिंती, कॉलन्यांतर्गत रस्ते दुरुस्तीची कामे देखील थांबली आहेत.
राज्यात सत्तांतर होताच भाजपला लक्ष्य करण्याचे काम उद्धव ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. सरकारच्या या निर्णयांमुळे विकासाला खिळ बसण्याची भीती आहे. किमान पायाभूत सुविधांची कामे थांबवायला नकोत, तसेच स्थगिती दिलेली कामे त्वरित सुरू करावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.