जळगाव -राज्यात अनेक ठिकाणी मान्सून धो-धो बरसत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असे असताना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गांधली परिसरात मात्र, अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. जुलै महिना उलटला तरी देखील पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार पेरणीचे पीकही धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत वरुणराजाची कृपा व्हावी म्हणून गांधली गावात जिवंत माणसाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. ग्रामीण भागात पूर्वापार ही प्रथा चालत आली आहे. अशी प्रेतयात्रा काढल्याने वरुणराजा प्रसन्न होतो, मुसळधार पाऊस पडतो, अशी ग्रामस्थांची धारणा आहे.
अमळनेर तालुक्यातील गांधली गावाच्या परिसरात यावर्षी अजूनही चांगला पाऊस पडलेला नाही. पावसाअभावी पेरण्या झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. तिबार पेरणीचे संकट उभे ठाकल्याने शेतकरीराजा आता वरुणराजाला धावा घालत आहे. अशातच ग्रामीण भागात प्रचलित असलेल्या आख्यायिकेनुसार गांधलीकरांनी एका जिवंत माणसाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.
वरुणराजा बसर रे बाबा...