जळगाव- तीन दिवसांपूर्वी अमळनेर शहरातील साळीवाडा भागातील एका दाम्पत्याच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आज या दाम्पत्याच्या कुटुंबातील 5 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 11वर पोहोचला आहे. जिल्ह्याची वाटचाल 'रेड झोन'कडे होत असून अमळनेर शहर कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून समोर आले आहे.
अमळनेर शहरातील साळीवाडा भागातील एका दाम्पत्याला 3 दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचवेळी दाम्पत्यापैकी 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या महिलेसह तिच्या पतीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणेने या दाम्पत्याच्या कुटुंबीयांना तत्काळ क्वारंटाईन केले होते. त्यांना जळगावातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात दाखल करुन त्यांचेही स्वॅब घेऊन ते धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचा अहवाल आज जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला असून दाम्पत्याच्या कुटुंबातील 5 जणांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 4 पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एन. चव्हाण यांनी दिली आहे.
सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 11वर पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. आज पॉझिटिव्ह म्हणून समोर आलेले 5 रुग्ण तसेच यापूर्वी जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे 2 रुग्ण असे एकूण 7 रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एक रुग्ण कोरोनातून बरा होऊन घरी गेला आहे. एकट्या अमळनेरात 9 रुग्ण-आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 11 रुग्ण आढळले आहेत. त्यात जळगाव शहरातील 2 आणि एकट्या अमळनेर शहरात 8 तर अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील एका महिलेचा समावेश आहे. अमळनेर शहरातील साळीवाडा परिसरातील दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या दाम्पत्याचे किराणा दुकान आहे. त्यांच्या संपर्कात अनेक जण आल्याची भीती आहे. आता त्यांच्या कुटुंबातील 5 जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
अमळनेरमध्ये येणारे रस्ते सील
अमळनेर शहरातील साळीवाडा परिसरात एकाच कुटुंबात तब्बल 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून साळीवाड्यासह आजूबाजूचा परिसर कंटोनमेंट झोन जाहीर केला आहे. तसेच संपूर्ण शहरात संचारबंदी जारी केली आहे. अमळनेर शहरात येणारे सर्व रस्ते सील केले आहेत. शहरातून कोणालाही शहाराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन केले आहे. त्यांचेही लवकरच स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.