जळगाव - भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे माजीमंत्री गुलाबराव देवकर यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत आज जळगावात पत्रकारांशी बोलताना दिले. 'खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयी आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल. आम्ही एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागतच करू', अशी प्रतिक्रिया गुलाबराव देवकर यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने मंजूर केलेला कृषी सुधारणा कायदा आणि हाथरस घटनेच्या विषयाबाबत शनिवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यानंतर गुलाबराव देवकर पत्रकारांशी बोलत होते. देवकर पुढे म्हणाले की, भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नेते निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. वरिष्ठ नेत्यांनी खडसेंबाबत सकारात्मक भूमिका घेतली तर आमचा त्याला पाठींबा असेल. खडसेंच्या प्रवेशामुळे पक्षाला फायदा होणार असेल, पक्षसंघटन मजबूत होत असेल तर चांगलेच आहे. आम्ही खडसेंचे पक्षात स्वागतच करू, असे गुलाबराव देवकर यांनी सांगितले.