जळगाव -भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप केल्याचा आरोप होत असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विरोधकांप्रमाणे खडसेंचाही फोन टॅप करण्यात आला, अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. दरम्यान, या प्रकरणावर एकनाथ खडसेंनी मात्र, स्पष्ट बोलण्यास नकार दिला आहे. चौकशीअंती या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, अशी सावध प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे.
महाराष्ट्रातील काही नेत्यांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी अनिल देशमुख यांनी एक चौकशी समिती नेमली आहे. या समितीत दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दोन अधिकाऱ्यांच्या समितीमध्ये श्रीकांत सिंग आणि अमितेश कुमार हे दोन अधिकारी आहेत. कोण कोण अधिकारी इस्त्रायलला गेले होते? त्याचा तपास होईल. चौकशी समितीला सहा आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.
हेही वाचा - गुलाबरावांनी मुलासारखं वागायला हवं होतं; खडसेंचे पाटील यांना प्रत्युत्तर