महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावधान..! बाजारात अप्रमाणित 'सॅनिटायझर'ची सर्रासपणे विक्री, अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष?

सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी हँड सॅनिटायझर आणि तोंडाला बांधण्यासाठी मास्कचा वापर खूप वाढला आहे. हीच गरज लक्षात घेऊन अधिक नफा मिळवण्यासाठी बाजारात काही कंपन्यांकडून बनावट तसेच अप्रमाणित सॅनिटायझरची विक्री केली जात आहे. मात्र, या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असे काही औषधी दुकानदारांचे म्हणणे आहे.

sanitizers
सॅनिटायझर

By

Published : Aug 19, 2020, 7:14 PM IST

Updated : Aug 20, 2020, 10:53 PM IST

जळगाव -सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी हँड सॅनिटायझर आणि तोंडाला बांधण्यासाठी मास्कचा वापर खूप वाढला आहे. हीच गरज लक्षात घेऊन अधिक नफा मिळवण्यासाठी बाजारात काही कंपन्यांकडून बनावट तसेच अप्रमाणित सॅनिटायझरची विक्री केली जात आहे. मात्र, या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अप्रमाणित सॅनिटायझरचा वापर केल्याने आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम हाती घेऊन योग्य ती कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाकडून सॅनिटायझरच्या नमुन्यांची तपासणीच होत नसल्याचे समोर आले आहे.

बाजारात अप्रमाणित 'सॅनिटायझर'ची सर्रासपणे विक्री

कोरोनापासून बचाव करण्यासाठी सध्या मास्क आणि सॅनिटायझर ही दोन महत्त्वाची शस्त्रे मानले जात आहेत. कोरोनावर प्रभावी ठरेल, अशी लस किंवा औषधाचा अद्याप शोध लागला नाही. त्यामुळे सॅनिटायझर आणि मास्क या दोन्ही बाबींच्या वापरामुळे कोरोनाला रोखता येऊ शकते. म्हणून सॅनिटायझर आणि मास्क आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहेत. सॅनिटायझरला तर आधीपेक्षा कितीतरी पटीने मागणी वाढली आहे. कोरोना येण्याच्या पूर्वी सॅनिटायझर हे फक्त दवाखान्यातील शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता विभाग अशा ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरले जात होते. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सॅनिटायझर सर्वत्र वापरले जाते. प्रत्येक जण सॅनिटायझरचा वापर करत असल्याने मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीचा फायदा घेत अनेक उत्पादक बनावट किंवा अप्रमाणित सॅनिटायझर बाजारात आणत आहेत. बनावट आणि अप्रमाणित सॅनिटायझर सर्रासपणे बाजारात विकले जात असताना अन्न आणि औषध प्रशासनाचे मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.

तीन प्रकारचे असते सॅनिटायझर

सॅनिटायझरचा दर्जा, त्याचा वापर तसेच सध्याच्या काळात सॅनिटायझरला असलेली मागणी व होणारी विक्री याबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जळगाव जिल्हा मेडिकल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे म्हणाले की, सॅनिटायझर तीन प्रकारचे असते. त्यात आयुर्वेदिक, कॉस्मेटिक आणि ऍलोपॅथी, असे प्रकार आहेत. आयुर्वेदिक आणि कॉस्मेटिक प्रकारातील सॅनिटायझरच्या विक्रीसाठी आधीपासूनच परवान्याची आवश्यकता नाही. मात्र, ऍलोपॅथी प्रकारातील सॅनिटायझरच्या विक्रीसाठी परवाना आवश्यक असतो. सर्वसाधारपणे सॅनिटायझरमध्ये 99.9 टक्के जर्म किलिंग इफेक्ट असावे, असे सॅनिटायझर प्रमाणित मानले जाते.

काही जण इथेनॉलऐवजी मिथेनॉलचा वापर करतात हे अत्यंत धोकादायक

ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्टच्या नियमाप्रमाणे, सॅनिटायझरमध्ये इथेनॉलच असावे लागते. त्याचे प्रमाणही ठरलेले आहे. सॅनिटायझरमध्ये इथेनॉल प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त नको. हे प्रमाण कमी जास्त असल्यास, असे सॅनिटायझर विषाणू मारण्यासाठी उपयोगी ठरत नाही. बनावट तसेच अप्रमाणित सॅनिटायझरमध्ये इथेनॉलऐवजी मिथेनॉलचा वापर होतो. मिथेनॉल असलेले सॅनिटायझर हे अधिक घातक असते. मिथेनॉल तोंडात किंवा डोळ्यात गेले तर ते शरीरास घातक ठरते. डोळे निकामी होण्याची भीती असते. मात्र, असे असताना आता सॅनिटायझरला मागणी वाढल्यामुळे अनेक कंपन्या बनावट तसेच अप्रमाणित सॅनिटायझर बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. सर्वसामान्यांसाठी बनावट किंवा अप्रमाणित सॅनिटायझर ओळखता येणे सोपे नाही. तसे ओळखताही येत नाही. केवळ कमी किंमत म्हणून सर्रासपणे प्रत्येक जण बनावट, अप्रमाणित सॅनिटायझर खरेदी करतात. परंतु, अशा सॅनिटायझरमुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते, असे सुनील भंगाळे यांनी सांगितले.

जळगावात गेल्या 5 महिन्यात एकही कारवाई नाही

भारतात मार्चपासून कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यानंतर सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली. वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी बनावट आणि अप्रमाणित सॅनिटायझर बाजारात विक्रीसाठी आणले. या विषयाबाबत जळगाव जिल्हा मेडिसिन डिलर्स असोसिएशनने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारी केल्या. परंतु, मागील 5 महिन्यात अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात एकही कारवाई केली नसल्याचा आरोप देखील जळगाव जिल्हा मेडिसिन डिलर्स असोसिएशनच्या वतीने सुनील भंगाळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तक्रारींकडे लक्ष देत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. पण उपयोग झाला नाही, असेही भंगाळे म्हणाले.

जळगाव जिल्ह्यात दरमहा 30 लाखांची उलाढाल

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जळगाव जिल्ह्यात सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सॅनिटायझरची विक्री 90 टक्क्यांनी वाढली. सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात सॅनिटायझर विक्रीची दरमहा सुमारे 25 ते 30 लाख रुपयांची उलाढाल होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असताना सॅनिटायझरचे नमुने घेण्याची गरज आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासनाकडून सॅनिटायझरच्या नमुन्यांची गुणवत्ता तपासली जात नाही, असेही सुनील भंगाळे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर खबरदारी म्हणून नागरिक सॅनिटायझर वापरत आहेत. सॅनिटायझरचा मागणी एवढा पुरवठा होत आहे. नागरिक स्वतः नामांकित कंपनीचे सॅनिटायझर मागतात. आता अनेक नामांकित कंपन्यांचे सॅनिटायझर उपलब्ध असल्याचे जळगावातील काही औषधालय चालकांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी म्हणतात... आमच्याकडे तक्रारीच नाहीत

या विषयासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाचे जळगाव जिल्हा सहाय्यक आयुक्त (औषधे) व्ही. टी. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात बनावट आणि अप्रमाणित सॅनिटायझरची विक्री होत असल्याबाबत आमच्या विभागाकडे अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. परंतु, आम्ही प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील मेडिकल्समध्ये विक्री होणाऱ्या औषधींचे अचानक नमुने घेतो. त्यात सॅनिटायझरचे देखील नमुने घेतले जातात. औषधी व सॅनिटायझरची गुणवत्ता तपासणीसाठी हे नमुने घेतले जातात. पण, मागील 5 महिन्यात सॅनिटायझरचा केवळ एकच नमुना अप्रमाणित आढळला होता. तो तत्काळ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही सहाय्यक आयुक्त व्ही. टी. जाधव 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.

Last Updated : Aug 20, 2020, 10:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details