जळगाव -दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात सोमवारी (27 सप्टेंबर) सायंकाळनंतर सर्वदूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर धो-धो बरसल्यानंतर आज, मंगळवारी देखील सकाळपासून पाऊस सुरूच आहे. पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व जामनेर तालुक्यात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी जंगलासह कन्नड घाट परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे तितूर व डोंगरी नदीला पूर आला आहे. दुसरीकडे पाचोरा तालुक्यातील गळद नदीलाही मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. जामनेर तालुक्यात खडकी नदीवरील तोंडापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे.
- चाळीसगावात महिनाभरात चौथ्यांदा पूर-
चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी जंगलासह कन्नड घाट परिसरात सोमवारी रात्री अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा पूरस्थिती उद्भवली आहे. महिनाभरातच चौथ्यांदा चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांना पुरावा वेढा पडला आहे. डोंगरी व तितूर नदीला पूर आल्याने चाळीसगाव शहरातील घाट रोड, बामोशी बाबा दर्गा परिसर पाण्याखाली गेला आहे. सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तितूर नदीकाठच्या वस्तीत घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामठी, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी गावांना पुराचा वेढा पडला आहे.
- तितूर नदी पुन्हा कोपली-
तितूर नदीला सप्टेंबर महिन्यात चौथा पूर आला आहे. पुरामुळे कजगाव, नागद गावांना वेढा पडला आहे. या परिसरातील बांबरूड, गोंडगाव, कनाशी, पिंप्री या भागातील नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. कनाशी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गोंडगाव रस्त्यावरील ब्रिटीशकालीन नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरले आहे. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. पुराच्या पाण्यामुळे कजगाव-नागद रस्ता बंद झाला असून, या रस्त्यावरून जाणारी वाहतूक ठप्प होऊन परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
हेही वाचा -Jalyukt Shivar : तत्कालीन फडणवीस सरकारच्या 'जलयुक्त शिवार योजने'ची चौकशी सुरू
- जामनेर तालुक्यालाही मुसळधार पावसाने झोडपले-