महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 23, 2019, 9:25 PM IST

ETV Bharat / state

जळगावात होणार पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन; बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे आयोजन

पूर्णपणे साहित्याला वाहिलेले आणि विद्यार्थी केंद्रस्थानी असलेले साहित्य संमेलन घेणारे 'कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ' हे राज्यातील एकमेव विद्यापीठ असणार आहे. विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना परिपत्रक पाठवून साहित्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

जळगाव - 'कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ' आणि 'मुळजी जेठा महाविद्यालय' यांच्या संयुक्त विद्यमाने १३ व १४ ऑगस्ट रोजी पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव दिल्यानंतर हे पहिलेच संमेलन होत आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विद्यापीठाचा नामविस्तार झाला. बहिणाबाईंच्या साहित्याचा वारसा चिरंतन टिकावा, यासाठी विद्यापीठाने विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्याचे घोषीत केले होते. त्यानुसार मुळजी जेठा महाविद्यालयात १३ व १४ ऑगस्टला हे पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन होणार आहे. राज्यात या प्रकारचे विद्यार्थी साहित्य संमेलन प्रथमच होत आहे.

निवड आणि स्वरुप

दोन दिवसांच्या या संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, ३ परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन व मुलाखत असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची निवड फेरी घेण्यात येईल. महाराष्ट्रातील नामवंत साहित्यीक विद्यार्थ्यांच्या साहित्याची निवड करतील. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी आपली कला सादर करतील.

विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना परिपत्रक पाठवून साहित्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. संमेलनाचे प्रारुप ठरविण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. यामध्ये विद्यार्थी विकास संचालक डॉ. सत्यजित साळवे, ‍दिनेश नाईक, निरज देशपांडे, अशोक कोतवाल, बी. एन. चौधरी, संजीवकुमार सोनवणे, प्रा. पुष्पा गावित आणि प्रा. लतिका चौधरी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देणारे युवा महोत्सव प्रत्येक विद्यापीठात होत असतात. मात्र, पूर्णपणे साहित्याला वाहिलेले आणि विद्यार्थी केंद्रस्थानी असलेले साहित्य संमेलन घेणारे 'कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ' हे राज्यातील एकमेव विद्यापीठ असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details