महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोमवारपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा; तांत्रिक अडचणींच्या निराकरणासाठी नेमले ३३४ आयटी समन्वयक - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षा

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्ष व अंतिम सत्राच्या (बॅकलॉकसह) परीक्षांना सोमवार (१२ ऑक्टोबर) पासून प्रारंभ होत आहेत. ऑनलाईन व ऑफलाईन होणाऱ्या या परीक्षांसाठी ५३ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

university
सोमवारपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा

By

Published : Oct 10, 2020, 8:22 PM IST

जळगाव -कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष व अंतिम सत्राच्या (बॅकलॉकसह) परीक्षांना सोमवार (१२ ऑक्टोबर) पासून प्रारंभ होत आहेत. ऑनलाईन व ऑफलाईन होणाऱ्या या परीक्षांसाठी ५३ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

१२ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत या परीक्षा होत आहेत. ऑनलाईन परीक्षेसाठी ३९ हजार ९० विद्यार्थ्यांनी पर्याय निवडला असून, यामध्ये धुळे जिल्ह्यातील ११ हजार ५१३, जळगाव जिल्ह्यातील २१ हजार ९३४ व नंदूरबार जिल्ह्यातील ५ हजार ६४३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी १४ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी पर्याय निवडला असून यामध्ये धुळे जिल्ह्यातील ३ हजार ९८६, जळगाव जिल्ह्यातील ७ हजार २९८ व नंदूरबार जिल्ह्यातील ३ हजार १९० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी धुळे जिल्ह्यात ५३, जळगाव जिल्ह्यात ९४ व नंदूरबार जिल्ह्यात ३२ असे एकूण १७९ परीक्षा केंद्र राहणार आहेत.

४० प्रश्न सोडवावे लागणार:
वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असे परीक्षेचे स्वरूप असून पदवीस्तरावरील ६० गुणांच्या परीक्षेसाठी ९० मिनिटांचा कालावधी व ६० प्रश्न असतील. यातील कमीत कमी ४० प्रश्न सोडवायचे आहेत. पदव्युत्तर स्तरावर ६० गुणांच्या परीक्षेसाठी २ तासांचा कालावधी व ६० प्रश्न असतील. यातील कमीत कमी ४० प्रश्न सोडवायचे आहेत. बहिस्थ: अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या १०० गुणांच्या परीक्षेसाठी २ तास कालावधी व ५० प्रश्न असतील यातील ४० प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

३३४ आयटी-समन्वयक नेमले:
ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना डेस्कटॉप, लॅपटॉप विथ वेब कॅमेरा, स्मार्टफोनचा वापर करता येईल. या परीक्षांसाठी सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी ३३४ आयटी-समन्वयक नेमण्यात आलेले आहे. विद्यापीठाच्यावतीने सरावासाठी मॉकटेस्ट घेण्यात आल्या, शनिवारी दुपारपर्यंत ३४ हजार २८० विद्यार्थ्यांनी मॉकटेस्ट दिल्या. शिवाय विद्यार्थ्यांना मॉडेल प्रश्नसंच देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे व प्रवेशपत्र (हॉलतिकिट) वरील विषयांप्रमाणे परीक्षा द्यावी, असे विद्यापीठातर्फे कळविण्‍यात आले आहे.

परीक्षा नियंत्रण कक्ष स्थापन
महाविद्यालयनिहाय नेमण्यात आलेल्या आय.टी. समन्वयकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठात प्रा. के. एफ. पवार यांच्या समन्वयाखाली परीक्षा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच ऑनलाइन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे तांत्रिक अडचणींचे निराकरण सॉफ्टवेअरमधे Chatbot च्या सहाय्याने परीक्षार्थींचे प्रश्न त्वरीत सुटण्यास मदत होणार आहे. तांत्रिक व्यत्यय दूर न झाल्यास संबंधित महाविद्यालयाच्या आय.टी. समन्वयकाशी संपर्क साधावा. त्यानंतरही विद्यार्थ्यांना अडचण आल्यास sfc@digitaluniversity.ac किंवा desell@nmu.ac.in यावर ईमेल करावा.

स्वतंत्र संधी मिळणार:
कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही. पवार, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी तसेच अधिकारी, कर्मचारी हे परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार काही कारणास्तव विद्यार्थी परीक्षा देऊ न शकल्यास एक संधी म्हणून स्वतंत्र परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details