जळगाव -जिल्हा कारागृहात निकृष्ट जेवण मिळत असल्याचा आरोप करत मिथूनसिंग बावरी आणि कैद्यांनी कारागृह रक्षकांशी वाद घालून तुंबळ हाणामारी केल्याची घटना घडली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने कारागृह अधीक्षकांनी पोलिसांना पाचारण केले. जिल्हापेठ व मुख्यालयाचा फौजफाटा दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
जळगाव जिल्हा कारागृहात सुरक्षारक्षकाला पिस्तूल लावून कैद्यांनी मारहाण केल्याचे प्रकरण ताजेच आहे. कैद्यांची सुरक्षारक्षकाला मारहाण करण्याचे प्रकार नित्याचे झाल्याचे वारंवार समोर येत आहे. जिल्हाकारागृहात १८ कैदी कोव्हीड पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना कारागृहातील कलाभवन सभागृहात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून उपचार सुरू आहेत. कारागृहअधीक्षक नव्यानेच बदलून आले असून कैद्यांना बाहेरून मिळणारे साहित्य, जेवणाच्या डब्यांवर आता निर्बंध आले आहे. परिणामी बहुतांश कैद्यांना कारागृहातील जेवणच करावे लागत आहे.