जळगाव- जिल्ह्यातील रावेर येथील मन्यार वाडा मशिदीजवळ रविवारी रात्री दोन गटात हणामारी उसळली होती. यात 3 जण गंभीर जखमी झाले असून, 7 वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या हाणामारीत समाजकंटकांनी एका प्रौढाची डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालत निर्घृण हत्या केली आहे. सोमवारी (दि.23) सकाळी हा प्रकार उजेडात आला.
यशवंत मराठे (वय 58, रा. रावेर) असे हत्या झालेल्या प्रौढाचे नाव आहे. पोलिसांना सकाळी त्यांचा मृतदेह राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी रात्रीपासूनच रावेरात संचारबंदी लागू केली आहे. यात रसलपूर येथील जावेद सलीम (वय 25) व रावेरच्या बारी वाड्यातील दिगंबर अस्वार (वय 55), नीलेश भागवत जगताप (वय 26, रा. रावेर) हे गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे सर्वत्र अघोषित संचारबंदी होती. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक हाणामारी सुरू झाली. याचे कारण अज्ञाप स्पष्ट झाले नाही. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी रावेरात तळ ठोकून आहेत.