जळगाव- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जळगाव महापालिका हद्दीत 3 दिवसांचा 'जनता कर्फ्यू' जाहीर केला आहे. त्यामुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद आहे. मात्र, या बंद बाबतची कोणतीही पूर्वसूचना व्यापारी किंवा बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांना दिली नव्हती. म्हणून शुक्रवारी जिल्हाभरातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन आले होते. मात्र, बाजार समिती बंद असल्याने हा माल कोणीही खरेदी केला नाही. शेवटी संपूर्ण माल शेतकऱ्यांना नाईलाजास्तव फेकावा लागला. दरम्यान, बंद बाबत सूचना न दिल्याने फटका सहन करावा लागल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीत आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
जळगाव : बाजार समितीने बंदची कल्पना न दिल्याने फेकावा लागला शेकडो क्विंटल भाजीपाला - जळगावात शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान
जिल्हाभरातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन आले होते. मात्र, बाजार समिती बंद असल्याने हा माल कोणीही खरेदी केला नाही. शेवटी संपूर्ण माल शेतकऱ्यांना नाईलाजास्तव फेकावा लागला. दरम्यान, बंद बाबत सूचना न दिल्याने फटका सहन करावा लागल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीत आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
जनता कर्फ्यू दरम्यान शहरातील अत्यावश्यक सुविधा सोडून भाजीपाला मार्केट व आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने तीन दिवस बाजार समितीमधील भाजीपाला लिलाव बंद करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, बाजार समिती प्रशासनाकडून व भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना याबाबतची कोणतीही सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळी अनेक शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत आणला होता. त्यातच शहरातील भाजीपाला मार्केट देखील बंद राहणार असल्याने किरकोळ विक्रेतेही बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदीसाठी आले नव्हते. यामुळे जिल्हाभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्री करावा तरी कोठे? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच बाजार समिती प्रशासनाने देखील शेतकऱ्यांना आधी कळवले पाहिजे होते, असे सांगत शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
शेतकऱ्यांची वाहने गेटवरच थांबवली-
पहाटेपासून जिल्हाभरातील शेतकरी आपला माल बाजार समितीमध्ये आणू लागल्यानंतर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी भाजीपाला मार्केटचे प्रवेशद्वार बंद करून शेतकऱ्यांची वाहने रस्त्यावरच अडवली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीचा प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे काही काळ या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
व्यापाऱ्यांनी केली शेतकऱ्यांशी चर्चा-
यावेळी काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू जाहीर केल्यामुळे शहरातील बाजारपेठ देखील बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे भाजीपाला मार्केट जरी बाजार समितीने सुरू ठेवले असते तरीही तो माल खरेदी करण्यासाठी किरकोळ विक्रेते आलेच नसते, असे सांगत शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही अनेक शेतकऱ्यांनी व्यापारी व बाजार समिती प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. किरकोळ खरेदीदारांनीही पाठ फिरवल्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आपला माल परत घेऊन जावा लागला.
व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सूचना दिल्या नाहीत-
बाजार समितीकडून गुरुवारीच परिपत्रक काढून व्यापारांना सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना देखील माल आणू नये, अशा सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना या बाबतच्या सूचना न दिल्याने काही शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत आणला होता. शहरातील किरकोळ विक्रेत्यांनीही या ठिकाणी पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांना खरेदीदार मिळाला नाही, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी दिली.