जळगाव - पारोळा तालुक्यातील बोरी नदीवरील रखडलेल्या बंधाऱ्यांचे काम पूर्ण व्हावे, यासाठी गावकऱ्यांनी गेल्या ४ दिवसांपासून गुराढोरांसह बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे केवळ १५ टक्के काम उर्वरित असल्याने अमळनेर तसेच पारोळा तालुक्यातील काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
बोरी नदीवरील रखडलेल्या बंधाऱ्याच्या कामासाठी गावकऱ्यांचे उपोषण पारोळा तालुक्यातील सुमारे २५० हेक्टर शेती ओलीताखाली आणण्यासाठी तसेच परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, याकरिता २०१४ मध्ये बोरी नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले होते. यासाठी तत्कालीन आमदार साहेबराव पाटील यांनी साडेतीन कोटींची रुपयाची मंजुरी मिळवली होती. पहिल्याच टप्प्यात या बंधाऱ्याचे ८५ टक्के कामही पूर्ण झाले. मात्र, उर्वरित १५ टक्के काम सोडून ठेकेदाराने पलायन केले. यामुळे गावकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
या बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास यावे, म्हणून भिलाली गावासह परिसरातील गावकऱ्यांनी पाचव्यांदा उपोषण केले आहे. मात्र, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडून कोणीही दखल घेत नसल्याने आता २० ग्रामस्थांनी शासनाचा निषेध म्हणून सामूहिक मुंडनदेखील केले. यापूर्वी, लोकप्रतिनिधींनी खोटी आश्वासने देऊन आमचे उपोषण सोडवून घेतले. यावेळी मात्र, बंधाऱ्याचे काम मार्गी लागेपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.
प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज
या बंधाऱ्याचे ८५ टक्के काम अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण झाले आहे. मात्र, केवळ १५ टक्के काम रखडल्याने अमळनेर तसेच पारोळा तालुक्यातील काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटु शकला नाही आहे. प्रशासनाने पुढाकार घेतला तर हा विषय तत्काळ मार्गी लागू शकतो. त्यामुळे शासनाकडून याप्रश्नी लवकरात लवकर पावले उचलली गेली पाहिजे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.