जळगाव- कापूस लागवडीसंबंधी राज्यात आघाडीवर असलेल्या जळगाव जिल्ह्यात पूर्वहंगामी लागवडीची तयारी शेतकरी करीत आहेत. मात्र, राज्यात कुठेही कापसाचे बियाणे उपलब्ध होईना. त्यामुळे बियाण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी गुजरात आणि मध्यप्रदेशात धाव घेत आहेत. शेतकरी तेथून सरळ वाण तसेच बीटी वाणांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.
पूर्वहंगामी कापूस लागवड २५ मे पूर्वी व्हायला हवी, असे शेतकरी मानतात. परंतु, गुलाबी बोंड अळीला अटकाव करण्यासाठी तसेच इतर प्रतिबंधात्मक बाबींसाठी राज्यात त्या वाणाचे कापूस बियाणे मे ऐवजी जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल, असे कृषी विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, जूनमध्ये कुठल्या तारखेला हे बियाणे मिळेल, ती तारीख कृषी विभागाने सांगितलेली नाही. स्थानिक अधिकारी मे अखेरीस कापूस बियाणे मिळेल, असे सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत.
राज्यात कापूस बियाणे मिळेना; शेतकऱ्यांची गुजरात-मध्यप्रदेशात धाव - crop
पूर्वहंगामी कापूस लागवड २५ मे पूर्वी व्हायला हवी, असे शेतकरी मानतात. परंतु, गुलाबी बोंड अळीला अटकाव करण्यासाठी तसेच इतर प्रतिबंधात्मक बाबींसाठी राज्यात त्या वाणाचे कापूस बियाणे मे ऐवजी जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल, असे कृषी विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे
रावेर, मुक्ताईनगरमधील शेतकरी दर दोन तासात मध्यप्रदेशातून बियाणे आणू शकतील एवढे कमी अंतर आहे. याशिवाय रेल्वे, एसटी बसची सेवा गतिमान असल्याने अनेक शेतकरी तेथून बियाणे आणत आहेत. मध्यप्रदेशात कापसाचे सरळ वाण प्रतिपाकिट १ हजार रुपये तसेच बीटी वाण प्रतिपाकिट ९०० ते १००० रुपयांना मिळत आहे. गुजरात आणि मध्यप्रदेशात पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी बियाणे सहज उपलब्ध होत आहे. मात्र, त्यात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परराज्यातील बियाणे न घेता स्थानिक बाजारपेठेत बियाणे उपलब्ध झाल्यावरच पूर्वहंगामी कापसाची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यात ७० ते ८० हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित-
जळगाव जिल्ह्यातील सुमारे ७० ते ८० हजार हेक्टर क्षेत्रावर पूर्वहंगामी कापसाची लागवड अपेक्षित आहे. कापूस लागवडीसंबंधी यावल, रावेर, जळगाव तसेच चोपडा तालुक्यातील तापी नदीकाठी अनेक शेतकऱ्यांनी पूर्वमशागत तसेच ठिबकची व्यवस्था करून ठेवली आहे.