महाराष्ट्र

maharashtra

नव्या रोहित्राच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे स्वतःला खड्ड्यात गाडून आंदोलन

By

Published : Jan 23, 2021, 8:12 PM IST

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील हिरापूर येथील शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी महावितरण कंपनीच्या विरोधात लक्षवेधी आंदोलन केले.

शेतकऱ्यांचे स्वतःला खड्ड्यात गाडून आंदोलन
शेतकऱ्यांचे स्वतःला खड्ड्यात गाडून आंदोलन

जळगाव -जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील हिरापूर येथील शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी महावितरण कंपनीच्या विरोधात लक्षवेधी आंदोलन केले. वारंवार मागणी करुनही महावितरण कंपनीकडून जळालेले विद्युत रोहित्र बदलून दिले जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. व स्वतःला एका मोठ्या खड्ड्यात गाडून घेतले. या आंदोलनाची दखल घेऊन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसात नवे रोहित्र बसवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा मागे घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले.

हिरापूर येथे गेल्या 10 दिवसांपूर्वी विद्युत रोहित्र जळाले आहे. त्यामुळे वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यास अडचणी येत आहेत. कूपनलिका व विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत असल्याने पिके जळत आहेत. त्यामुळे जळालेले विद्युत रोहित्र तत्काळ बदलून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण कंपनीकडे केली. परंतु, महावितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होते. विद्युत रोहित्राच्या मागणीसाठी पाठपुरावा करत असताना महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांना थकीत वीजबिल भरण्याचे सांगत होते. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते.

अखेर शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल-

शेतकऱ्यांनी रोहित्राची मागणी केल्यावर आधी 80 टक्के वीजबिल भरा, तरच रोहित्र मिळेल, असे उत्तर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे शनिवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत हिरापूर येथे आत्मक्‍लेश आंदोलन केले. आत्मक्लेश आंदोलन करताना शेतकऱ्यांनी स्वतःला रोहित्राच्या ठिकाणीच खड्डा खोदून मानेपर्यंत गाडून घेतले होते. यावेळी विठोबा पाटील, मोतीलाल पाटील, जितेंद्र पाटील, भैय्या पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महावितरणच्या अधिकाऱ्यांची धावपळ-

हिरापूर येथे शेतकरी आंदोलन करत असल्याची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हिरापूरला धाव घेतली. शाखा अभियंता निसार तडवी यांनी दोन-तीन दिवसात रोहित्र मिळेल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, दोन-तीन दिवसात रोहित्र न बसवल्यास पुन्हा आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा-बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

ABOUT THE AUTHOR

...view details