जळगाव - पाणीपुरवठा विभागांतर्गत कार्यरत असलेले पाणी आणि स्वच्छता मिशनमधील कंत्राटी सल्लागार कर्मचारी, तसेच तालुकास्तरावरील समूह आणि गट समूह समन्वयकांच्या सेवेला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी जळगावात दिली. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा राज्यातील तालुका पातळीवरील 351 गट समन्वयक व 899 समूह समन्वयकांना लाभ होणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा -वाढीव बिलामुळे हैराण घरगुती ग्राहकांसाठी वीज नियामक आयोगापुढे सादर करणार प्रस्ताव - ऊर्जामंत्री
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकारांशी बोलत होते. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत तालुका पातळीवर 351 गट समन्वयक व 899 समूह समन्वयकांची पदे स्वच्छ भारत मिशनच्या कामासाठी 6 जुलै 2011च्या शासन निर्णयान्वये निर्माण करण्यात आली होती. या पदांचे मानधन व भत्ते राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या सहाय्य निधीमधून करण्यात येत आहे. तथापि, जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सुचनांनुसार गट समन्वयक व समूह समन्वयक या पदांसाठी निधीची उपलब्धता नसल्याने या पदांच्या सेवा 31 जुलै 2020 रोजी समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, ग्रामीण भागासाठी या पदांची आवश्यकता लक्षात घेऊन या पदांना मुदतवाढ मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.