जळगाव -भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी एकनाथ खडसे यांनी आयुष्यभर खूप कष्ट घेतले आहेत. राज्यात प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी एकनिष्ठ राहून पक्ष वाढवला. परंतु, पक्षाला जेव्हा सुगीचा काळ आला, तेव्हा पक्षाने त्यांना खड्यासारखे बाजूला केले. हेच त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे का? आता खडसेंनी अजून अपमान सहन न करता भाजपला रामराम करावाच, अशी उद्विग्न भावना खडसे समर्थकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा... मिटकरींची संधी हुकली? राष्ट्रवादीकडून 'या' दोन सदस्यांची विधानपरिषदेवर वर्णी
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या पक्षावर नाराज आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खडसेंच्या मुक्ताईनगरातील समर्थकांना काय वाटते? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, खडसे समर्थकांनी देखील भाजपकडून मिळणाऱ्या सापत्न वागणुकीवर नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा... #CAA : जामिया मिलिया विद्यापीठाची वेबसाईट हॅक
राज्यात 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यावर खडसेंना पद्धतशीरपणे डावलण्यात आले. त्यांच्यावरील एकही आरोप सिद्ध झालेला नसताना त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने तिकीट नाकारून अपमान केला. त्यांच्याऐवजी मुलीला तिकीट दिले. मात्र, त्यांचाही पक्षांतर्गत लोकांनी कुरघोड्या करत पराभव केला. या साऱ्या बाबी खडसेंवर अन्याय करणाऱ्या आहेत. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी कष्ट घेतल्यानेच भाजपची भरभराट झाली. मात्र, पक्षाने त्यांच्या कष्टाची जाण ठेवली नाही. खडसेंवर होणाऱ्या अन्यायाबद्दल केंद्रीय नेतृत्त्व देखील बोलायला तयार नाही. खडसेंनी भाजप सोडला तर काँग्रेसप्रमाणे भाजपलाही राज्यात उतरती कळा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब केंद्रीय नेतृत्त्वाने लक्षात घ्यायला हवी, अशा भावना काही खडसे समर्थकांनी यावेळी व्यक्त केल्या.