महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुलाबरावांनी मुलासारखं वागायला हवं होतं; खडसेंचे पाटील यांना प्रत्युत्तर

गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनी उत्तर दिले आहे. गुलाबराव जर म्हणतात की, मी खडसेंना वडील मानलं तर त्यांनीही मुलासारखं वागायला हवे होते, असे खडसे म्हणाले.

eknath khadse
एकनाथ खडसे

By

Published : Jan 28, 2020, 8:42 PM IST

जळगाव - गेल्या 40 वर्षाच्या राजकीय प्रवासात मी स्वकियांसह दुसऱ्या पक्षातील अनेकांवर वडिलांसारखे प्रेम केले. त्यात गुलाबराव पाटील यांचेही नाव घेता येईल. त्यांच्यावर मी वडिलांसारखं प्रेम केलं हे खरंय, पण गुलाबरावांनी देखील मुलासारखं वागायला हवं होतं, अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला आहे. यापूर्वी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर टीका केली होती.

एकनाथ खडसे

हेही वाचा - हे बरं नव्हं ! महामेट्रोच्या जाहिरातीत मंत्र्यांची नावे नसल्याने नितिन राऊतांची नाराजी

पाटील म्हणाले होते, "एकनाथ खडसेंनी माझ्यावर वडिलांसारखे प्रेम केले; पण मला मुलगा कधी मानलं नाही." अशा शब्दांत शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना दोन दिवसांपूर्वी भुसावळात नागरी सत्काराला उत्तर देताना चिमटा काढला होता. खडसेंनी पाटील यांनी उत्तर दिले आहे. ते आपल्या जळगाव येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.

खडसे म्हणाले की, गुलाबराव पाटील राजकारणात आले तेव्हापासून आपल्या आक्रमक शैलीमुळे परिचित आहेत. ते जिल्हा परिषद सदस्य होते तेव्हापासून मी त्यांना भावी आमदार म्हणून प्रोजेक्ट केले होते. फक्त तेच नाहीत तर त्या काळातील अनेकांना मी मार्गदर्शन केले आहे. अनेकांवर वडिलांसारखे प्रेम केले आहे. गुलाबरावांच्या बाबतीत बोलायचे म्हटले तर आम्ही दोघेही वेगवेगळ्या पक्षाचे नेते होतो. त्यामुळे पक्षाच्या धोरणानुसार, निर्णयानुसार वागावे लागे. भाजप-सेना एकत्र होती तेव्हा एकत्र निर्णय व्हायचे. पण दोन्ही पक्ष वेगळे झाल्यानंतरही मी वडिलकीच्या नात्याने त्यांच्यावर प्रेम केलं. पण त्यांनीही मुलाप्रमाणे वागायला हवं होतं, असा टोला खडसेंनी हाणला.

गुलाबरावांना 'तसं' वाटणं स्वाभाविक -

खडसेंनी कार्यकर्त्यांचा रक्तगट तपासायला हवा होता, असे पाटील म्हणाले होते. या मुद्द्यावर बोलताना खडसे म्हणाले, माझ्या 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात मी एकही निवडणूक हरलो नाही. हे केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर शक्य झाले. कार्यकर्त्यांच्याही काही अपेक्षा असतात. अपेक्षा पूर्ण न झालेल्या काही 6 ते 7 कार्यकर्त्यांनी माझ्याशी दगाबाजी केली. त्यामुळेच कदाचित गुलाबराव पाटील यांना तसं वाटलं असेल, असेही खडसे यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details