महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केळी पीकविम्याचे जाचक निकष बदलावे; एकनाथ खडसे यांची राज्य सरकारकडे मागणी

एकनाथ खडसे यांनी राज्यातील शेतकरी व कोरोनाच्या लढ्यात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची राज्य सरकारकडे मागणी केली आहे. केळी उत्पादकांसाठी पीक विम्याच्या अटी शिथील कराव्यात, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे

By

Published : Sep 25, 2020, 5:51 PM IST

जळगाव- राज्य सरकारने केळी पीकविम्याचे जाचक निकष तातडीने बदलून केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशीही मागणी खडसे यांनी यावेळी केली. ते माध्यमांशी बोलत होते.

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर येथे फार्महाऊसवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ खडसे म्हणाले, की जिल्ह्यातील केळी पिकावर कुकुंबर मोजॅक विषाणुचा हल्ला झाला आहे. त्यामुळे केळीचे पीक खोडातून जळून जात आहे. जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावर विषाणुमुळे परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळायला हवा. परंतु, राज्य सरकारने पीकविमा योजनेचे निकष बदलले आहेत. काही अटी नव्याने समाविष्ट केल्या आहेत. त्या अतिशय जाचक असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकत नाही. पीकविमा योजनेच्या जाचक अटी बदलणे गरजेचे आहे. त्या अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच असायला हव्यात, अशी मागणी खडसेंनी यावेळी केली.

केळी पीकविम्याचे जाचक निकष बदलावे



खरीप हंगाम गेला वाया-

यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, मका, तीळ, उडीद व मूग अशा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती एक रुपयाही मिळणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी खडसेंनी मागणी केली.

आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार करावे-

एकनाथ खडसे म्हणाले, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर्स, परिचारिका व रुग्णवाहिका चालक तसेच इतर कर्मचारी हे कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. परंतु, आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे या कोरोना योद्धांना अनेक अडचणी येत आहेत. राज्य सरकारने कोरोना योद्धांचे पगार तातडीने केले पाहिजेत. गेल्या आठवड्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी डॉक्टरांचे पगार झाले. पण अजूनही परिचारिका व रुग्णवाहिका चालक यांचे पगार झालेले नाहीत. केंद्राच्या एनआरएचएम योजनेत हजारो कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचा सेवा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र, त्यांची सेवा अजून वाढविण्यात आली नाही. याबाबतही निर्णय अपेक्षित असल्याचे खडसेंनी सांगितले.

दरम्यान, गेली काही दिवस एकनाथ खडसे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.

ABOUT THE AUTHOR

...view details