जळगाव- आयुष्यभर मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर मी टीका केली. त्यांच्या गैरकारभारावर आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला, त्यांच्यासोबत राहण्याची दुर्दैवी वेळ आज माझ्यावर आली आहे, अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगावात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. या कार्यक्रमात एकनाथ खडसेंनी नेहमीप्रमाणे आपल्या सडेतोड शैलीत स्वकियांसह विरोधकांचा समाचार घेतला.
ते पुढे म्हणाले, माझ्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात मी ज्या लोकांवर तसेच पक्षांवर टीका केली. आज त्यांच्यासोबत रहावे लागत आहे. ज्या काँग्रेसने जन्मापासून शिवसेनेवर जातीयवादी पक्ष म्हणून टीका केली. तीच काँग्रेस आज शिवसेनेसोबत गळ्यात गळा घालत आहे, असा चिमटा काँग्रेसला काढत 'सत्तातूरांना न भय, न लज्जा', अशा तिखट शब्दांत खडसेंनी सत्तेसाठी धडपड करणाऱ्या सर्वच पक्षांना लक्ष केले.
हेही वाचा - आमदार अनिल पाटलांचा यू-टर्न; शरद पवारांसोबतच असल्याचे केले स्पष्ट
आज सत्तेसाठी महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडत आहेत, त्या महाराष्ट्र पहिल्यांदाच अनुभवत आहे. अशा घडामोडी बिहार, झारखंड, कर्नाटक या राज्यांमध्ये घडत असतात. मात्र, महाराष्ट्रातील जनता पहिल्यांदाच असा प्रकार पाहत आहे. हे महाराष्ट्रातील राजकारणाचे दुर्दैव आहे, असेही ते म्हणाले.
अजित पवारांना क्लीन चिट हा योगायोग की...
विदर्भ सिंचन महामंडळातील 70 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातील 8 फाईल बंद करण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज जाहीर केले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांना क्लीन चिट दिल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला आणि अजित पवारांना क्लीन चिट मिळाली, हा योगायोग आहे की हेतुपुरस्सर हे घडले आहे, हे कळायला मार्ग नाही. माझ्यावर भ्रष्टाचाराचा नुसते आरोप झाले. त्यावेळी मी नैतिक जबाबदारी म्हणून लगेच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, आज काय सुरु आहे, हे तुम्हाला चांगले माहिती आहे. आज लोकांचा नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे, असेही खडसे यावेळी म्हणाले.