जळगाव - माजीमंत्री एकनाथ खडसे यांचे आरोप निराधार आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. त्यांना काहीतरी चुकीची माहिती मिळाली असून त्याआधारे ते आरोप करत आहेत. चुकीच्या माहितीच्या आधारे बोलणे संयुक्तिक नाही, अशा शब्दात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
विधानसभा निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनीच जाणीवपूर्वक माझे तिकीट कापले. त्यांना माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणायची होती, असा आरोप एकनाथ खडसेंनी केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. याच विषयासंदर्भात गिरीश महाजन गुरुवारी दुपारी जामनेरात आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. खडसेंनी केलेल्या प्रत्येक आरोपावर यावेळी त्यांनी खुलासा केला.
गिरीश महाजन पुढे म्हणाले, "एकनाथ खडसे यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे किंवा त्यांना चुकीची माहिती मिळाली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत आम्ही कुणीही खडसेंच्या नावाला विरोध केलेला नाही. तशी चर्चा देखील तेव्हा झालेली नव्हती. राज्यात चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता यांच्यासारख्या बड्या नेत्यांचे तिकीट नाकारण्यात आले. हा निर्णय सर्वस्वी कोअर कमिटीच्या नेत्यांचा होता. मात्र, खडसेंना कुणीतरी चुकीची माहिती दिली असावी, एकीकडे एवढ्या मातब्बर नेत्यांना तिकीट मिळाली नाहीत. खडसेंच्या कन्या अॅड. रोहिणी खडसेंना तरी पक्षाने तिकीट दिले, हे लक्षात घेतले पाहिजे. ते म्हणत असतील तर या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे. त्यात दोषी आढळलो तरच या प्रकरणात आमची जबाबदारी असेल"
हेही वाचा -होय, मी शिवसेनेच्या संपर्कात; खडसेंच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ
पुराव्यांशिवाय आमच्यावर असे निराधार आरोप करणे चुकीचे आहे, असेही महाजन यावेळी म्हणाले. दरम्यान, तिकीट वाटपात ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात न घेतल्याने भाजपच्या जागा घटल्या, या खडसेंच्या आरोपाचे देखील महाजन यांनी खंडन केले. तिकीट वाटपाचा निर्णय हा केंद्रीय कोअर कमिटीचा असल्याने तसा विषयच येत नसल्याचे महाजन यांनी सांगितले.