जळगाव- शॉर्टसर्किटमुळे आठ एकरावरील ऊस जळून भस्मसात झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहार्डी शिवारात ही घटना घडली. या घटनेत तीन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी करून महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
चहार्डी येथील स्वप्निल प्रकाश महाजन, प्रशांत प्रकाश महाजन व ईश्वरलाल दत्तू चौधरी या तीनही शेतकऱ्यांची निमगव्हाण रस्त्यालगत शेती आहे. त्यांनी शेतात आठ एकर क्षेत्रामध्ये उसाची लागवड केली होती. मंगळवारी रात्री उसाच्या शेताला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत संपूर्ण आठ एकरावरील उसासह ठिबक सिंचन संच व पाईप जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चहार्डी ग्रामस्थांनी शेतांमध्ये धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग क्षणार्धात भडकल्याने ऊस जळून खाक झाला.
अग्निशमन दलाचे प्रयत्नही निरर्थक-
उसाला लागलेली आग आटोक्यात येत नसल्याने काही ग्रामस्थांनी चोपडा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही वेळेतच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. बंबांद्वारे ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण ऊस जळून भस्मसात झाला. त्यामुळे या तीनही शेतकऱ्यांची लाखोंचे नुकसान झाले आहे.