जळगाव - चोपडा तालुक्यात सरासरी ७१९ मिलिमीटर एवढ्या म्हणजे १०० टक्के पावसाची नोंद शासकीय दप्तरी आहे. त्या तुलनेत दिनांक २९ ऑगस्ट पर्यंत ७१९.५ मिमी एवढा पाऊस पडला आहे. त्यात मालापूर येथील गूळ प्रकल्पात एकूण जिवंत जलसाठयाच्या ७७ टक्के भरला आहे.
दमदार पाऊस तालुक्यात पडल्याने या वर्षी या प्रकल्पात पाणी भरपूर जमा झाले आहे. एवढेच नाही तर दररोज या मध्यम प्रकल्पातून ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तालुक्यात सध्या पर्यंत १००.०६ टक्के पावसाची नोंद शासकीय दप्तरी करण्यात आली आहे. तसेच या गूळ प्रकल्प परिसरात ९७० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे, अशी माहिती शाखा अभियंता प्रीती पोटदुखे यांनी दिली.