जळगाव -कोरोनासारख्या कठीण काळात लोकांना मदत करणे सोडून राज्यातील सत्ताधारी घरात बसले आहेत. सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्य लोकांची चिंता नसेल पण आम्हाला आहे. त्यांनी कितीही टीका केली तरी लोकांना हे बरं वाटतंय की कुणीतरी येऊन आमचं दुःख पाहतंय. आम्ही राजकारण काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी करत नाही तर जनतेसाठी करतो. जनतेच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी कितीही गंभीर परिस्थिती असली तरी आम्ही त्यांच्यापर्यंत जाणारच आणि त्यांना दिलासा देणार, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होणाऱ्या टीकेला आज जळगावात जोरदार प्रत्युत्तर दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे राज्याचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात गुरुवारी जळगावात असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी सत्ताधारी, राज्यासह जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, कोरोनासाठीच्या उपाययोजना अशा विषयांवर मते मांडली. देवेंद्र फडणवीस सुरुवातीला विशेष कोविड रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदार तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडून कोरोना रुग्णांच्या उपचाराबाबत आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जावून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी कोरोनाचा वाढता संसर्ग, बाधितांचा वाढता मृत्यूदर व संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात टेस्टिंग वाढविण्याबाबत सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
हेही वाचा -जळगावात झालेल्या वाहन अपघातात प्रवीण दरेकर जखमी; खासगी रुग्णालयात केली तपासणी
जळगावात ठोस उपाययोजनांची गरज...
जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूदर काळजी करण्यासारखा आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढविण्याची गरज आहे. सध्या प्रमाणापेक्षा कमी टेस्टिंग होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. टेस्टिंगचे अहवाल चार-चार दिवस येत नसल्याने संसर्ग वाढून रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे 24 तासात अहवाल येणे आवश्यक असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. जिल्ह्यासाठी रुग्णवाहिका देखील कमी असल्याने रुग्णांचे मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका वाढविण्याची मागणीही आम्ही केली. रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था उशिरा होते. वाहनांना वेळेवर डिझेल मिळत नाही, अशा तक्रारी जळगावात असल्याचेही ते म्हणाले.