जळगाव - कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. एकीकडे अशी परिस्थिती असताना राज्याच्या सत्तेत असलेले तीनही पक्ष एकमेकांशी लढत आहेत. ही अवस्था योग्य नाही, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, यावेळी त्यांनी मोबाईलवरील एका संदेशाचा संदर्भ देत 'एक नारद, शिवसेना गारद', अशा शब्दांत टीका करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुलाखतीच्या टीझरच्या विषयावर चिमटा काढला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे राज्यभर ठिकठिकाणी दौरा करत आहेत. बुधवारी जळगावात मुक्कामी थांबल्यानंतर गुरुवारी सकाळी ते जळगावातील दौऱ्याच्या कामाला लागले. तत्पूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, संपूर्ण देश आणि राज्य कोरोनाच्या संकटांशी सामना करत आहे. मात्र, राज्य सरकार उपाययोजना करण्यात कमी पडत आहे. रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर टेस्टिंग वाढवल्या पाहिजेत. कोरोनाचे संक्रमण वाढत असताना राज्य सरकार उपाययोजना न करता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत आहे. कोरोनासारख्या कठीण काळात फोडाफोडी आणि कुरघोडीचे राजकारण करणे योग्य नाही. कोरोनाशी लढा देण्यासाठी उपाययोजनांवर फोकस करण्याऐवजी सत्तेतील तीनही पक्ष एकमेकांशी भांडत आहेत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
सामनाच्या टीकेवर आम्ही कधीही प्रतिक्रिया देत नाहीत